Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

अकोला : पावसातील खंडामुळे पश्चिम विदर्भातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी (ता.

२०) अकोल्यात दिली.

शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मुदतपूर्व पीक पाहणी व पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, कृषी आयुक्त परिमल सिंह यांच्यासह खासदार, आमदार, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध होत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर निरंतर योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासह नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. धोकादायक व उघड्या अवस्थेतील डीपींबाबतही तत्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.

अकोला: बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे. बनावट दुष्काळी यादीवर कारवाई दरम्यान, दुष्काळग्रस्त तालुक्यांची कथित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. शासनाने अद्याप अशी कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नसल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या बनावट माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

५६ तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील परिस्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. पावसातील खंड आणि असमान पर्जन्यमानामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून त्यांना तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश भरणे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *