Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिककरांवर अन्याय नको-छगन भुजबळ

कुंभमेळ्यामुळे नाशिकची प्रगती होत असली तरी त्याच्या तयारीत स्थानिक नागरिकांवर अन्याय होता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका मंत्री अन्न व नागरिक पुरवठा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची प्रलंबित भूसंपादनाची देणी तातडीने द्यावीत, रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत, तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील खड्ड्यांमुळे नाशिकचे नाव खराब होत असून, रस्त्यांची कामे नीट आणि लवकर पूर्ण झाली पाहिजेत. इतर मोठ्या रस्त्यांची कामेही गतीने करावीत, असे भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असून, त्याची पाहणी आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.पर्यटकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत त्यांनी शांततेचे आवाहन केले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशा घटना माध्यमांमध्ये गेल्यास पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

वृक्षतोडीच्या घटनेबाबत भुजबळ म्हणाले की, मनपा आयुक्तांशी आपण बोललो असून संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुमारे ५० झाडे तोडण्यात आली असून, झाडे तोडणाऱ्यांसह त्यासाठी सांगणारे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण जनतेनेही केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत. राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात येणार असल्याने त्यापूर्वी तयारी पूर्ण करण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या बैठकीत संत-साधूंचे प्रतिनिधी सहभागी करून त्यांचे मार्गदर्शन घेतल्यास अडचणी टाळता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.भूसंपादनाबाबत ते म्हणाले, ”३८ हजार कोटी रुपये खर्च करणार असतील तर मागील शेतकऱ्यांची आणि ठेकेदारांची प्रलंबित देणी अगोदर द्यावीत. कुंभमेळ्याचे स्वागत आहे; मात्र बाहेरच्या लोकांसाठी रेड कार्पेट अंथरताना स्थानिक नाशिककरांचे प्रश्न दुर्लक्षित करता कामा नये, असेही भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळांच्या प्रमुख मागण्या

रस्त्यांची कामे लवकर व दर्जेदार पूर्ण करा.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे.

झाडे तोडणाऱ्यांसह सांगणाऱ्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करा.

कुंभमेळ्यापूर्वी प्रलंबित भूसंपादनाची देणी शेतकऱ्यांना द्या.

कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिककरांवर अन्याय होता कामा नये.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *