
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी आणि कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्येक आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी सकाळी क्षेत्रीय पाहणी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
पाहणीनंतर केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जात असल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा आदेश काढला. या आदेशानुसार, महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांनी आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी सकाळी क्षेत्रीय पाहणी करावी.
ही पाहणी करताना प्रभागातील स्वच्छता, रस्ते, मलवाहिनी, घनकचरा व्यवस्थापन यासह अतिक्रमण, पाणीपुरवठा, आरोग्य यासह अन्य अडचणी आणि त्रुटी यांची नोंद करून घ्यावी. तसेच, या अडचणींची पूर्तता ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निवारण होणाऱ्या कामांचे त्यांच्या स्तरावरच तातडीने निराकरण करणे ही क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे तत्काळ प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. महापालिकेच्या मुख्य खाते, तसेच मुख्यालयाच्या पातळीवरील मंजुरी, आवश्यक प्रशासकीय मान्यता या बाबी तत्काळ तपशिलासह संबंधित विभागप्रमुखांना कळविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
क्षेत्रीय स्तरावरील प्रश्न सोडविताना अडचणी आणि त्यावरील कार्यवाहीचे छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत, ‘पूर्वीचे व नंतरचे’ अशा स्वरूपात काढून पुराव्यासाठी जतन करणे हे संबंधित अधिकाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रत्येक आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी केलेल्या कामकाजाचा क्षेत्रीय आणि परिमंडळनिहाय अहवाल दर शुक्रवारी महापाालिका आयुक्तांकडे व संबंधित अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘गुगल शीट’ दर आठवड्याला भरावी लागणार आहे.
महापालिका आयुक्त दर सोमवारी सकाळी नागरी समस्यांसंदर्भात बैठक घेणार आहेत. त्या बैठकीला परिमंडळ उपायुक्त, सहायक आयुक्त, कनिष्ठ अभियंत्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामे होत नसल्याबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राम यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास त्याची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिका आयुक्तांनी दिला आहे.



