सिंहस्थात गर्दीवर एआयची नजर; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पाच हजार कॅमेऱ्यांचे जाळे, एक हजारांची नव्याने भर

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक – त्र्यंबकेश्वरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जात आहे.
साधुग्राम, नवीन घाट आणि वाहनतळे आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रशासनाने नाशिक शहरात एक हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी नियोजित कॅमेऱ्यांची एकूण संख्या पाच हजारांवर पोहोचणार आहे.
प्रयागराजनंतर २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. गोदाकाठावरील दाट वस्तीत कुंभमेळा भरत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन हे यंत्रणांसमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने एकात्मिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी नाशिक शहरात तीन हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक हजार, असे एकूण चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे. मूळ आराखड्यात साधुग्राम, नव्याने विकसित होणारे घाट आणि शहरातील वाहनतळांचा समावेश नव्हता. आता या ठिकाणांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
साधुग्राममध्ये ३५० कॅमेरे
प्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एक हजार कॅमेऱ्यांपैकी सुमारे ३५० कॅमेरे तपोवनातील साधुग्राममध्ये बसवले जातील. देशभरातून दाखल होणारे साधू-महंत येथे वास्तव्यास असतील. शहराच्या हद्दीतील वाहनतळांवर २५०, तर गोदावरी नदीकाठावरील नवीन घाटांवर सुमारे ४०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्हींचे जाळे गर्दी नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. कॅमेरे बसवण्याचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रण, ड्रोनद्वारे देखरेख, माहितीचे विश्लेषण आणि मध्यवर्ती कमांड सेंटरशी संलग्नता, असे टप्पे पार पडतील. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे विशाल नेटवर्क कार्यान्वित होणार आहे.



