राघव चड्ढांचा डाव त्यांच्यावरच उलटला; निवडणूक आयोगाच्या खुलाशाने पर्दाफाश, पाच मुद्द्यांमध्ये समजून घ्या प्रकरणाचे गुढ…

भाजपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे नाव दिल्लीतील मतदारयादीत अचानक समाविष्ट झाल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाचे गुढ प्रचंड वाढले आहे. एकीकडे पंजाबमधील तात्पुरत्या यादीतून SIR अंतर्गत नाव वगळल्यानंतर चड्ढा यांनी थेट आम आदमी पक्षावर राजकीय षडयंत्राचा आरोप केला होता.
पण त्याचवेळी दुसरीकडे त्यांनी दिल्लीतील यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी त्याआधीच अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
दिल्लीतील मतदारयादीत चड्ढा यांचे नाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाविष्ट झाल्याचा आरोप आपने केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच दिल्लीतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा खुलासा केल्यानंतर चड्ढा यांच्यासह आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
1. अशी झाली सुरूवात…
राघव चड्ढा यांनी ३ सप्टेंबर रोजी सोशल मीडियात एक पोस्ट केली. पंजाब सरकारने राजकीय सूड उगवत आपले नाव मतदारयादीतून वगळल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे आरोप आपने फेटाळून लावले होते.
2. दिल्लीतील मतदारयादीत नाव
पंजाबमधील यादीतून नाव वगळण्यात आल्यानंतर काही तासांतच चड्ढा यांचे नाव दिल्लीतील मतदारयादीत समाविष्ट झाल्याचे सांगत आपने निवडणूक आयोग आणि चड्ढा यांच्यावर गंभीर आरोप केले. बॅकडेटेड पध्दतीने आयोगाने चड्ढा यांना झुकते माप देत बेकायदेशीरपणे त्यांचे नाव यादीत टाकल्याचा आरोप आपने केला.
3. आयोगातील अधिकाऱ्यांचा खुलासा
वाद पेटल्यानंतर दिल्लीतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला. चड्ढा यांनी दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघातील यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी फॉर्म ६ भरला होता. त्यानुसार प्रक्रिया पार पडल्यानंतर २ सप्टेंबरला त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे १६ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत एसआयआर प्रक्रियेअंतर्गत दिल्लीतील मतदार यादी गोठविण्यात आली होती. ३१ ऑगस्टला तात्पुरती यादी प्रसिध्द झाली होती. त्यात चड्ढा यांचे नाव नव्हते.
4. गंभीर प्रश्न उपस्थित
आयोगाच्या खुलाशानंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पंजाब मतदारयादीतून जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आल्याचा आरोप चड्ढा यांनी केला होता. मात्र, त्यांनी २६ ऑगस्ट रोजीच दिल्लीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. एखाद्या मतदारसंघातून किंवा राज्यातील मतदारयादीतून अन्य राज्यात नाव स्थलांतरित करण्यासाठी प्रक्रिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया चड्ढा यांनी पार पाडली नाही, तरीही आयोगाने त्यांचे नाव दिल्लीत कसे समाविष्ट केले, असा प्रश्न आपने उपस्थित केला आहे.
5. ‘आप’वर खोटे आरोप?
चड्ढा यांनी ही प्रक्रिया केली असेल तर मग त्यांनी ३ सप्टेंबर रोजी आप सरकारवर खोटे आरोप केले का? असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे आयोगाकडून चड्ढा यांच्यासाठी पायघड्या पसरल्या. चड्ढा यांनी २६ ऑगस्ट रोजी अर्ज केल्यानंतर लगेच २ सप्टेंबरला ते मतदार होतात. पण एका महिलेने ५ ऑगस्टला अर्ज करून आजपर्यंत बीएलओचीही नेमणूक झालेली नाही. यावरून चड्ढा यांच्यासाठी आयोगाकडून किती धावपळ करण्यात आली हे स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ अधिकच गडद होत चालले आहे.



