नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त, एईआरएने VTP सवलतींना दिली मंजुरी

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला मंजुरी दिल्याने, या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई सेवा विस्ताराला मोठी गती मिळणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे अधिक स्वस्त होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सवलतीसाठीची पात्रता मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग ऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग अशी बदलण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात भरीव सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
विमान कंपन्यांना कोणती सवलत मिळणार आहे?
नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग – पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १०० टक्के पूर्ण सूट मिळेल.
५,००० किमी पर्यंतचे कमी अंतराचे मार्ग: दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत मिळेल.
५,००० किमी पेक्षा जास्त लांब पल्ल्याचे मार्ग: दुसऱ्या वर्षी ५० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत मिळेल.
अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फेऱ्या: अस्तित्वात असलेल्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास ७५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.
आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा : पहिल्या वर्षी ९० टक्के आणि दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत दिली जाईल.
या सवलतीचे महत्त्व आणि फायदे काय आहेत?
१) विमान कंपन्यांसाठी हे सुधारित निकष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक बनवतील. यामुळे नवीन हवाई मार्गांचा जलद विकास होईल आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल.
२) अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्गांमुळे प्रवाशांना अधिक पर्यायी गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि स्वस्त तिकीट दर उपलब्ध होतील.
३) मालवाहू वाहतूक (कार्गो) – मालवाहू विमानांसाठी दिलेल्या सवलतींमुळे या भागातील एअर कार्गो कनेक्टिव्हिटीच्या वाढीस मोठा पाठिंबा मिळेल.



