
धुळे : जिल्ह्यात नव्या उद्योगांना चालना देत रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’चे आयोजन उद्या (दि. ११) रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.
उद्योग आयुक्तालय, सहआयुक्त (उद्योग व सेवा) कार्यालय, नाशिक विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही परिषद धुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देणारी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
परिषदेचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल राहणार आहेत. जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक चर्चा या परिषदेत होणार असून विविध गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या परिषदेस खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे आणि सत्यजीत तांबे यांच्यासह आमदार मंजुळाताई गावित, अनुप अग्रवाल, काशिराम पावरा व राघवेंद्र भदाणे उपस्थित राहणार आहेत. उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकही परिषदेत सहभागी होणार असून जिल्ह्यातील औद्योगिक संधींवर सविस्तर मंथन केले जाणार आहे.
उद्योगांसाठी पोषक वातावरण
धुळे जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे, नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि त्यातून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. ‘धुळे जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक प्रयत्न’ या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या आयोजनासाठी उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि विशेष आयुक्त मैत्री वैभव वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) संतोष गवळी तसेच नाशिक विभागाच्या सहआयुक्त (उद्योग व सेवा) वृषाली बी. सोने यांनी उद्योजक, गुंतवणूकदार आणि संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची परिषद
धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची मानली जात असून सुरू असलेले मनमाड-इंदूर आणि धुळे-नरडाणा रेल्वे प्रकल्प, राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे विस्तारीकरण, औद्योगिक संपर्क रस्त्यांचे जाळे, सिंचन व पाणीपुरवठ्यासाठीचे विविध जलप्रकल्प आणि पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली गुंतवणूक यांचा एकत्रित परिणाम जिल्ह्यात उद्योगवृद्धी, व्यापार विस्तार आणि रोजगारनिर्मितीसाठी विकासाचा मजबूत दुवा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकासाच्या अनेक मुद्यांवर चर्चा…
यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना उपलब्ध होणाऱ्या शासकीय योजना, निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन, कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग, लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊसिंग तसेच नवउद्योजकांसाठी आवश्यक सुविधा यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्योग क्षेत्रातील शासकीय यंत्रणा आणि खासगी गुंतवणूकदार यांच्यात समन्वय वाढवून धुळे जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.



