
Rajasthan News : एका शेतकऱ्याला बायकोपासून पैसे लपवण्याची सवय भलतीच महागात पडली आहे. त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे तब्बल ५ लाख रुपयांच्या रोकडीचा चुराडा झाला. प्लॉट विकून मिळालेले ५ लाख रुपये कुटुंबीयांपासून लपवण्यासाठी त्याने चोरीच्या भीतीने शेतात खड्डा खोदून ते पैसे पुरून ठेवले.
मात्र, त्याला विसरण्याची सवय असल्याने त्याने पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच तो विसरून गेला. सर्वांनाच अचंबित करणारा हा प्रकार राजस्थानमधील बालोतरा येथे घडला आहे.
५ लाख शेतात पुरले अन् विसरला!
बालोतरातील शेतकरी मांगिलाल मेघवाल यांनी जमीन विकली. त्याचे ५ लाख रुपये मिळाले. या पैशांची चोरी होईल, तसेच बायकोही पैसे खर्च करेल या भीतीने त्यांनी रोकड जमिनीत पुरून ठेवली. मात्र, काही काळानंतर पैसे नेमके कोठे पुरले हेच त्याला आठवेना. त्यामुळे बराच शोध घेऊनही त्यांना पैसे सापडले नाहीत.
पैसे सापडले नाहीत, अखेर पत्नी आणि मुलांना सांगितले
बराच शोध घेऊनही पैसे न मिळाल्याने अखेर मांगिलाल यांनी ही बाब पत्नी आणि मुलांना सांगितली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. सुरुवातीला कुटुंबीयांना त्यांच्या म्हणण्यावर विश्वास बसला नाही. मात्र, मांगिलालने समजावून सांगितल्यानंतर त्यांनीही शेतात पैशांचा शोध सुरू केला. तरीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
वर्षभरानंतर सापडली नोटांची पिशवी
पैसे पुरून जवळपास एक वर्ष उलटल्यानंतर पावसाळा झाला आणि शेतात पेरणीचे काम सुरू झाले. त्याचदरम्यान जमिनीत पुरलेली नोटांची पिशवी अचानक बाहेर आली. मांगिलालची पत्नी आणि मुलाच्या हाती ही पिशवी लागली. दोघांनी पिशवी उघडली असता त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे दिसले. मात्र, हे पैसे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. कारण वाळवीने संपूर्ण नोटा अक्षरशः फस्त केल्या होत्या. वाळवी लागल्यामुळे नोटांचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते.
बँकेनेही खराब झालेल्या नोटा स्वीकारण्यास दिला नकार
यानंतर कुटुंबीय खराब झालेल्या नोटा घेऊन पचपदरा येथील एसबीआयच्या शाखेत गेले. नोटांची अवस्था पाहिल्यानंतर बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ते बालोतरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतही गेले; मात्र तेथेही नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. या प्रकारानंतर मांगिलालची पत्नी आणि मुलगा त्यालाच दोष देत आहेत. चोरीच्या भीतीने कुटुंबापासून पैसे लपवण्याचा निर्णय अखेर त्यांच्यासाठी मोठ्या आर्थिक नुकसानीचे कारण ठरला.



