भारताच्या ऐतिहासिक स्वप्नपूर्तीचा क्षण: अमेरिका, फ्रान्स, रशियाला धक्का; Air Force ला मिळणार ‘MK1A’

भारताचा चार दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाहिलेल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी बळ दिलेल्या या संकल्पनेला अखेर मूर्त रूप मिळत आहे.
भारताने स्वदेशी लढाऊ विमानाच्या निर्मितीत मोठी प्रगती साधली असून, आता भारतीय हवाई दलाला पहिले स्वदेशी तेजस MK1A विमान एप्रिलच्या अखेरीस सुपूर्द केले जाणार आहे.
HALच्या प्रयत्नांना यश
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस प्रकल्पांतर्गत MK1A फाइटर जेट तयार केले आहे. हे विमान HAL च्या नाशिक प्लांटमध्ये तयार झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या ऑर्डरनुसार त्याची निर्मिती झाली आहे. HAL ने प्रतिवर्षी 16 लढाऊ विमाने तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नाशिकमधील नवीन प्रगत प्लांटमुळे ही क्षमता आता 24 विमानांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.
इंदिरा गांधी यांचे स्वप्न, वाजपेयींचा पाठिंबा
भारतातील वैज्ञानिकांनी 1980च्या दशकात लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) विकसित करण्याचा विचार सुरू केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1983मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 1984मध्ये एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ची स्थापना झाली, मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प मंद गतीने पुढे सरकत होता.
2001मध्ये या लढाऊ विमानाने पहिली चाचणी उड्डाण घेतले. तर 2003मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी याला “तेजस” नाव दिले. अखेर 2015मध्ये तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले आणि आता त्याच्या अधिक प्रगत आवृत्तीचा हवाई दलात समावेश होणार आहे.
तेजस MK1A: भारताचा स्वदेशी राफेल?
तेजस MK1A हे 4.5+ पिढीचे लढाऊ विमान असून, सुखोई आणि राफेलच्या तोडीचे मानले जाते. भारतातील हवाई दलातील विमानांच्या गरजा तेजस सीरिजद्वारे पूर्ण केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे रशिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या महाशक्तींना हा धक्का बसू शकतो. कारण भारताने आता परदेशी लढाऊ विमाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या व्यापारावर परिणाम होईल.
भारताने याआधी रशियाकडून मिग आणि सुखोई तसेच फ्रान्सकडून मिराज, जग्वार आणि राफेल विमाने विकत घेतली होती. मात्र आता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल टाकले आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा
तेजस MK1A मुळे भारतीय हवाई दलाच्या ताकदीत मोठी वाढ होईल. स्वदेशी तंत्रज्ञान आणि निर्मितीक्षमतेमुळे भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहे, आणि त्यामुळेच महाशक्ती राष्ट्रांना चिंता वाटत आहे. एप्रिलच्या अखेरीस हे विमान हवाई दलात दाखल झाल्यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्यात एक नवीन पर्व सुरू होईल.