
कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.
जनतेला जिथे आहे तिथेच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. मात्र गर्दी सतत गंगेकडे सरकत असल्याने प्रशासनही हतबल झालं आहे.
अनेक ऋषी-मुनींनीही भाविकांना आपापल्या ठिकाणी राहण्याचे आणि कुठेही न जाण्याचे आवाहन केलं आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. पण लोकं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वत्र पळत आहेत.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे कळत आहेत. ज्यांच्यावर सेक्टर 2 मध्ये बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.