
संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी अद्याप अटक झालेला नाही, तपास यंत्रणा देशमुख कुटुंबियांना माहिती देत नाही, कोर्टात केस लढण्यासाठी अपेक्षित असलेले वकील नाहीत, तपास कुठपर्यंत आला याचे अपडेट्स नाहीत, वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, यामुळे धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी आंदोलन केलं.
मस्साजोग येथील पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांनी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. स्वतः पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. तर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हेदेखील मस्साजोगला गेले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीमुळे धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी पोलिस अधीक्षकांनी त्यांच्याशी चर्चादेखील केली. सरकार आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. एवढंच नाही तर वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही कुणालाच सोडणार नाही, असं जरांगे म्हणाले.
धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, एसआयटीचे प्रमुख आणि सीआयडीच्या प्रमुखांना फोन केल्याची माहिती आहे. यावेळी फडणवीसांनी एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना दिल्याचं सांगितलं जातंय. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.
फडणवीसांनी दिल्या सूचना
संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा, या प्रकरणातला एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांना दिल्या. शिवाय कुणालाच दयामाया दाखवू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यासह मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला.