सांगली : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून काल सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला होता. यातील एका तरुणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत.
वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडलाय. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके (वय 24) या युवकाचा मृत्यू झाला. संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे ही हल्ल्यातील जखमींची नावे आहेत.
या हल्ल्यातील मुख्य आरोपी हा बरेच वर्षांपासून पुणे येथे राहायला असून रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्यांच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत. वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे .
वायफळे येथील फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते. दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता.
तासगावच्या वायफळे गावात नेमकं काय घडलं?
गुरुवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला. त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे.
दरम्यान, आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले. यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला. याचवेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री यामध्ये आल्या. त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली. सर्वचजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकलवरुन धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. दरम्यान, भरचौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे.