दिल्लीत काल महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. याचसाठी ही बैठक आजोयित करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
त्यामुळे आता आज मोठी घोषणा होणार का यावर सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, या बैठकीनंतर काही बोलके फोटो देखील समोर आले आहे. यामध्ये काही गोष्टी अत्यंत स्पष्ट दिसत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये कुणाला किती खाती मिळणार यावर चर्चा झाली. मात्र कोणती खाती मिळणार यावर चर्चा न झाल्याची माहिती आहे. त्यानुसार सर्वात जास्त म्हणजे जवळपास 20 खाती भाजपकडे असू शकतात, तर त्याखालोखाल खाती शिंदेंकडे असतील. तसंच सर्वात कमी खाती अजित पवार यांच्या पदरात पडणार आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपदावरुनही सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी भाजप हायकमांड धक्का देणार का? यावर आता सर्वांची नजर आहे. दरम्यान या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्यात परत येणार आहेत. त्यामुळे आता हे नेते महाराष्ट्रात आल्यानंतर काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष आहे. तसंच दुसरीकडे या सरकारचा शपथविधी येणाऱ्या 2 किंवा 5 डिसेंबरला होईल अशी शक्यता आहे.