स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर आगीच्या झळा लागल्यामुळे पतीसुद्धा गंभीर भाजला गेला आहे.
पती-पत्नीच्या नात्यात कितीही बेबनाव असला तरीही सामंजस्यातून त्यावर तोडगा निघू शकतो याचा विचार केला जात नाही. मात्र, बेबनाव जेव्हा कौटुंबिक हिंसाचारापर्यंत पोहोचतो,तेव्हा महिलादेखील स्वतःच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी पोलिसात जाण्याचं धाडस दाखवू लागल्या आहेत. हेच पत्नीचं कृत्य पतीला रुचलं नाही,आणि त्या रागातून त्यानं चक्क तिला भररस्त्यात पेटवल्याची केरळातली ही घटना हादरवून टाकणारी आहे.
पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या अलाप्पुझामध्ये ही घटना घडली आहे. यात मरण पावलेल्या महिलेचं नाव आरती (32) असं आहे. ती पट्टानक्कड इथली राहणारी होती. तर पती श्यामचंद्रन गंभीर भाजला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी आरती आपल्या स्कूटीवरून ऑफिसला निघाली होती. त्यावेळी तिच्या पतीने, श्यामने रस्त्यात तिची गाडी अडवून तिला थांबवलं. आरतीच्या अंगावर त्यानं पेट्रोल टाकलं. श्यामनं आपली गाडी अडवल्यानंतर तो काय करतो आहे, हे आरतीच्या लक्षात येण्यापूर्वीच श्यामने तिची स्कूटी पेटवून दिली होती.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिला स्वतःला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. गाडीने पेट घेतल्यामुळे आगीच्या ज्वाळांमध्ये आरती अडकली. ती मदतीसाठी आरडाओरडा करत होती. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की,याचदरम्यान श्यामलासुद्धा आगीच्या झळा बसल्या. ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोघांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरतीवर तातडीने उपचार सुरू झाले. मात्र, संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. यात श्याम हा गंभीर भाजला आहे. तोसुद्धा मृत्यूशी झुंजत आहे. तिथल्याच शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती आणि श्याम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बेबनाव होता. त्यामुळे आरतीने श्यामच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. तिने तक्रार दाखल केल्यामुळे श्याम तिच्यावर नाराज होता. त्यामुळं त्यानं हे पाऊल उचललं असावं.