
मे महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असून तापमानात वाढ झाल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. कडाक्याच्या उन्हापासून शरिराला थंडावा मिळावा म्हणून आहारात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकूसारख्या फळांचा समावेश केला जातो. या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आज आपण चिकू खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे कोणते होतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आद्र्रता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व आणि नसíगक फलशर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधीलया गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे. चिकू खाण्याचे फायदे –
बालकांना अभ्यास व खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये फलशर्करेचे प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते.
चिकू हे मधुर, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करून थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते. चिकू, शीतल व दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.
चिकू खाल्ल्याने आतडय़ांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात. रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खाल्ल्यास रक्तदाब प्राकृत होतो.
ज्यांना वारंवार चक्कर येण्याचा त्रास होत असेल तसेच शरीरातील साखर वारंवार कमी होत असेल, लो शुगरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चहा, बिस्किटं खाण्याऐवजी चिकू खावा. या चिकूमधील नसíगक फलशर्करा लगेचच रक्तात शोषली जाते व चक्कर, थकवा, ग्लानी ही लक्षणे कमी होतात.
ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
चिकूच्या सालीचा काढा अतिसार व ताप यामध्ये दिल्यास जुलाब व ताप ही लक्षणं कमी होतात. कारण चिक्कूच्या सालीमध्ये टॅनिन हा घटक असतो आणि हा घटक शक्तिवर्धक व तापनाशक आहे.
चिकू ७-८ तास लोण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास शरीरामधील दाह, डोळ्यांची, हातपायांची जळजळ, आम्लपित्त ही पित्तप्रकोपक लक्षणं कमी होतात.
चिक्कूमध्ये असणाऱ्या आद्र्रता व तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रुग्णांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिक्कू खाल्ल्यास शौचास साफ होते.
सावधानता काय बाळगाल –
कच्चे चिक्कू खाऊ नयेत, कारण हे चिक्कू बेचव असतात व त्यामधील चिकामुळे तोंड कोरडे पडते तसेच मलावरोध व पोटात दुखणे या तक्रारी दिसून येतात. पिकलेला चिक्कू स्वच्छ धुऊन खावा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सहसा चिक्कू खाऊ नये.