पुणे : सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यात दोन दिवसांच्या विसाव्यासाठी येत आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे. याच दरम्यान, जी २० परिषदेची बैठक देखील शहरात होणार असून या महत्वाच्या सोहळ्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहे. पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तब्बल सात हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करणार आहे. तसेच शहरातील वाहतुकीतदेखील बदल करण्यात आला आहे. यंदा सात ते आठ लाख भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सात हजार पोलिस, होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते. आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले, सोमवारी १२ जून रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात येत असून १५ जूनला शहर हद्दीतून पुढे मार्गक्रमण करणार आहेत. याच सुमारास जी २० परिषदेनिमित्त जगभरातील ३७ देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पालखी आगमनावेळी शहरातील वाहतूकीमध्ये तसेच शहरात येणार्या महामार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त पुण्यात ठेवण्यात येणार आहे. आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पालखी सोहळ्यात गैर प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. या सोबतच उन्ह जास्त असल्याने ठीक ठीक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. या साठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला आहे. पालख्यांचे ठिकाण समाजावे त्याची लाईव्ह माहिती मिळावी या साठी जीपीएस यंत्रणा असलेल्या मोटार सायकल पालख्यांच्या सोबत असणार आहे. तसेच गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे.
जी २० परिषदेसाठी आलेले पाहुणे अनुभवणार पालखी सोहळा
पुण्यात याच दरम्यान जी २० परिषद होणार आहे. या साठी विविध देशातील पाहुण्यांचे आगमन पुण्यात होणार आहे. दरम्यान, हे पाहुणे देखील पालखी सोहळा याची देही याची डोळी अनुभवणार आहे. यासाठी खास व्यवस्था पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव अन्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. या जागेची संयुक्त पाहाणी करण्यात आली आहे