जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, भाजप महिला सेलने पोलिसांना दिले निवेदन

नवी मुंबई: भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई भाजप महिला मोर्चाने केली आहे. या बाबत आज एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी निवेदन दिले आहे. आव्हाड यांनी ९ जुन रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांची चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे.
चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा. त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.असा दावाही यावेळी केला गेला. जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी विनंती करीत एपीएमसी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.