ताज्या बातम्या

आता कांदा काढणी होईल सोपे, कांदा पात कापणीचे स्वयंचलित यंत्र केले विकसित


कांदा या पिकाचा जर आपण एकूण उत्पादन खर्चाचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने कांदा लागवड आणि कांदा काढणी यावर जास्त प्रमाणात खर्च होत असतो. मजुरी वरचा खर्च आणि वेळ देखील खूप जास्त प्रमाणात लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.

परंतु आता शेतकऱ्यांसाठी कांदा काढणे अगदी सोपे होणार असून याकरिता नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन इंजिनिअरिंग कॉलेज व श्री. एच.एच.जे.बी.तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करावा लागतो व त्या माध्यमातून येथील मेकॅनिकल या शाखेच्या विद्यार्थ्यांनी कांदा काढणी व पात कापण्यासाठी उपयोगी ठरेल असे स्वयंचलित पात कापणी यंत्र विकसित करण्यास सुरुवात केली.

अशाप्रकारे केली कांदापात यंत्राची निर्मिती

या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे तसेच सागर ऐशी हे तरुण शेतकरी कुटुंबातील असून प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक तालुक्यातील आहेत. त्यामुळे त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जवळून माहिती आहेत. म्हणून त्यांनी त्यांना असलेल्या तांत्रिक ज्ञान आणि विविध शोधनिबंध यांचा अभ्यास केला व त्या माध्यमातून वापरायला सोपे तसेच मर्यादित खर्च व उपयुक्तता या बाबींना प्राधान्य देत यंत्र विकसित करण्यावर भर दिला.

या विद्यालयाचे प्राध्यापक किशोर सोनवणे यांनी प्रकल्प मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारून त्यांना मार्गदर्शन केले व कांदापात यंत्र तयार करण्यात आले होते. परंतु त्यामध्ये काही समस्या होते. याचा पुरेपूर अभ्यास करून त्यामध्ये योग्य अंतरावर कांदा पातीची कापणी व कांदा विलगीकरण या टप्प्यांवर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले व अथक प्रयत्न करून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी यंत्र विकसित केले.

अशा पद्धतीचे आहे हे यंत्र

या यंत्राची जाडी दोन मिलिमीटर असून तीन बाय दीड इंच आकाराच्या एम एस पाईप वर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने याचा सांगाडा तयार करण्यात आलेला आहे. या यंत्राची ने आण करता यावी याकरिता मागच्या बाजू 14 इंच आकाराच्या परिघांमध्ये दोन चाके देखील जोडण्यात आली असून पुढील भागामध्ये आधार मिळावा यासाठी बोल्टच्या आधारे स्टॅन्ड बनवण्यात आला आहे.

यामध्ये शेतातून पातीसहित काढलेले कांदे यंत्राच्या मागच्या भागात वरील बाजूस हॉफरमध्ये टाकले जातात. यामध्ये एक मीमीचे सीट मेटल असून या माध्यमातून हॉपरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे एकावेळी यामध्ये एक क्रेट भर पातीसहित कांदे टाकता येतात. यामध्ये कांदे यंत्रात टाकल्यानंतर ते पुढे जावेत याकरता कनवेअर सिस्टम असून त्यासाठी जीआयशीटचा वापर करण्यात आलेला आहे. या यंत्रामध्ये कांदे पुढे गेल्यानंतर ते पातीसहित कापता यावेत याकरिता वर्तुळाकार असे स्लॉटेड रोटर असून त्यामध्ये एकूण 28 ओळी आहेत. या ओळीमध्ये नऊ स्लॉट देण्यात आले असून एकुण 252 चौकोनी स्लॉट या यंत्रामध्ये आहेत. या यंत्रामध्ये कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी राहते. तेव्हा यामध्ये रोटर फिरतो त्यानंतर पात कटरच्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ ती कापली जाते. त्यानंतर पुढे कांदा व कापलेली पात वेगळी होते. वेगळा झालेला कांदा हा ट्रे च्या माध्यमातून संकलित केला जातो व भांड्यात जाऊन पडतो.

तसेच या यंत्रामध्ये कन वेअर बेल्ट आणि रोटरवर नियंत्रण मिळावे याकरिता गिअरबॉक्स व वेगवेगळ्या आकारांचा पुलींचा वापर करण्यात आलेला आहे. यासाठी सिंगल फेज विद्युत पुरवठ्याची गरज भासते. साधारणपणे हे यंत्र तयार करण्यासाठी 62 हजार रुपये खर्च आला असून त्याची तयार करण्याची मजुरी व इतर खर्च धरल्यास ही किंमत 90 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या यंत्राच्या माध्यमातून एका तासाला दहा क्विंटल कांदा कापणी आरामात होऊ शकते. त्यामुळे वेळ आणि मजुरीच्या खर्चात बचत होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे याला चाके दिले असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते आरामात नेता येते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *