संभाजीनगरमध्ये होणार 27 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; महानगरपालिका करणार अंदाजे 150 कोटींचा खर्च

छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियम येथील सुमारे 27 एकर जागावर अंदाजीत 100 ते 150 कोटी खर्च करून एक भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारला जाणार आहे. तर या नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमबाबत महापालिकेचा मानस असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. आम्हाला खेळू द्या या संकल्पनेतून महानगरपालिका मंजूर लेखांकनात खुल्या जागा किंवा ओपन स्पेस आणि मैदान लोकसहभागातून आणि श्रमदानातून लहान मुलांसाठी विकसित करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयुक्तांनी शहरातील क्रीडाशी संबंधित प्रत्येक घटकाची एक बैठक आज स्मार्ट सिटी कार्यालय येथे घेतली, याप्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, लॉन टेनिस, रनिंग आणि इतर क्रिडाक्षेत्रांसाठी अंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्ट किंवा मैदान विकसित करण्याचे मानस आहे. मुलांच्या हातात मोबाईल किंवा दगड ऐवजी मी चेंडू बघू इच्छितो. आम्हाला खेळू द्या या संकल्पनेचा हेतू तरुण पिढीला मोबाईल टीव्ही आणि व्यसना पासून दूर ठेवणं हे आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील तरुणांना शासकीय आणि खाजगी नोकऱ्या आणि रोजगार मिळण्याची जास्त संधी असते.
ज्या ज्या वसाहतीत खुल्या जागा उपलब्ध आहे परंतु ते अस्वच्छ आहे किंवा तिथे अतिक्रमण झालेले आहे अशा जागा महानगरपालिका लोकसहभाग आणि श्रमदानातून मोकळी करून देणार आहे.त्यांची देखरेख व जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांवर राहील. यासाठी महानगरपालिका खुल्या जागा दत्तक देण्यासाठी एक पॉलिसी तयार करणार आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्तांनी बैठकीतील उपस्थित विविध क्रीडा क्षेत्रातून आलेले खेळाडू आणि तज्ञ तसेच प्रशिक्षक यांच्याकडून सल्ला देखील मागितला आहे.या दिशेने आपण काय करू शकतो याबाबत त्यांनी लेखी अहवालाच्या माध्यमातून त्यांना कळविण्यासाठी आवाहन केले आहे.
आराखडा तयार करण्याच्या सूचना
याशिवाय ज्या मोठ्या जागांवर खेळण्याचे मैदानाचे आरक्षण आहे किंवा खेळण्याचे मैदान अस्तित्वात आहे त्यांना देखील विकसित करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तर या बैठकीत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो कराटे, जुडो, स्विमिंग, बुद्धिबळ कुस्ती, सायकलींग इत्यादी प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू आणि तज्ञ यांची उपस्थिती होती.