ताज्या बातम्या

फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करावं लागणार सरकारी अध्यादेश जारी


मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करावं लागणार आहे. याची घोषणा राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
याचा सरकारी अध्यादेश आज (शनिवार) काढण्यात आला. वर्ध्यातून या नव्या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

सरकारी अध्यादेशात म्हटलं की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात साजरा होत आहे. याचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी तसेच मोबाईलवर पाहुण्यांशी किंवा सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संभाषणाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ने होणार आहे.
आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांना सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात नमस्कार सारखे संबोधनात्मक शब्द आजही मोठया प्रमाणात वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूह, समुदाय, धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिकच सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे.
शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत. तथापि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना ‘हॅलो’ हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला व संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकीन जागवणारा केवळ एक औपचारिक अभिवादन करणारा शब्द आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयांत प्राप्त होणाऱ्या दूरध्वनीवरील संभाषणाची सुरुवात बहुतेक वेळा ‘हॅलो’ या शब्दाने होत असल्याने शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांशी संवाद साधताना जनतेप्रती अपेक्षित असणारी निकटता साधण्यात अडथळे येतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोर आल्यानंतर होणान्या संवादाची सुरुवात जर “वंदे मातरम्’ या अभिवादनाने केली सर संवादकर्त्यांमध्ये परस्परांप्रति एक आपुलकीची भावना निर्माण होऊन पुढील संवाद निश्चितच सकारात्मक होण्यास मदत होऊन त्यातून एक नवीन ऊर्जा मिळू शकेल. तसेच ‘हॅलो’ सारख्या निरर्थक शब्दांचा वापर थांबून राष्ट्राप्रती आदर व्यक्त करणा-या एकसमान शब्दोच्चाराची सवय आपोआपच वृद्धिंगत होईल. राज्यातील हा उपक्रम अन्य राज्याकरिताही मार्गदर्शक ठरू शकेल, असंही या अध्यादेशात म्हटलं आहे.

‘वंदे मातरम’ अभिवादनासाठी मार्गदर्शक सूचना

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित, अनुदानित, अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प, उपक्रम, आस्थापना येथील कार्यालयात लँडलाईन किंवा मोबाईलवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी. तसेच त्यांनी त्याच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संपाद साधतानाही ‘वंदे मातरम्’ असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करण्यात यावे.

कार्यालयांत, संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात ‘वंदे मातरम्’ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.

ज्या ठिकाणी आयव्हीआरएसची सुविधा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.

विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ही ‘वंदे मातरम्’ या शब्दांनी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

व्यापक जनसंपर्क असणाऱ्या यंत्रणांनी ‘वंदे मातरम’ अभिवादनाचा अधिकाधिक वापर करावा. उदा. राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकावरील उद्घोषणांची सुरुवात अंगणवाडी, आरोग्यसेविका यांच्याकडून विविध समाजघटकांशी होणाऱ्या दैनदिन संवादाची सुरुवात इत्यादी.

तसेच सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमातून या अभियानाचा प्रचार करावा असंही या अध्यादेशात म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *