ताज्या बातम्या

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, जातीची अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहित, विधवा, घटस्फोटीत चालेल २ आपत्यपेक्षा जास्त असणारी चालणार नाही


 

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. औरंगाबाद महापालिकेची मुदत संपूनही कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

निवडणुका कधी होणार? याबाबत स्पष्टता नाही मात्र निवडणुकीच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. औरंगाबाद शहरात सध्या एका पोस्टर्सची भलतीच चर्चा सुरु आहे. हा पोस्टर पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२ साठी तीन मुलं असलेल्या बापाने लावलेल्या एका बॅनरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही अजब आहे. औरंगाबादच्या रमेश पाटील यांनी या बॅनरच्या माध्यमातून चक्क बायको पाहिजे असा मजकूर लिहिल्याने विविध स्तरावर याबद्दल चर्चा सुरु आहे. रमेश विनायक पाटील हे महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार त्यांना याठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात उतरणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शहरात अशा आशयाचे बॅनर्स झळकावले आहेत.

काय लिहिलंय या पोस्टरमध्ये?

औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२, मला तीन मुले असल्याकारणानं मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. तिला जातीची अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहित, विधवा, घटस्फोटीत चालेल फक्त २ आपत्यपेक्षा जास्त असणारी चालणार नाही. ३५ वर्षीय रमेश विनायक पाटील यांनी या बॅनरवर त्यांचा फोन नंबरही दिला असून इच्छुक महिलेला संपर्क करण्यास सांगितले आहे.

काय म्हणाले रमेश पाटील?

इच्छुक उमेदवार रमेश पाटील म्हणाले की, मला १ मुलगा आणि दोन मुली आहेत. लॉकडाऊनमध्ये मला एक मुलगी झाल्यानं आता मी निवडणूक लढण्यास पात्र नाही. त्यासाठी मी दुसरं लग्न करुन बायकोला निवडून आणण्याची शक्कल लढवली. मला सकाळपासून एक फोन आला त्यांनी सांगितले आमच्याकडे १५-१६ एकर जमीन आहे. निवडणुकीचा खर्चही द्यायला तयार असल्याचं म्हटलं परंतु मी अद्याप प्रतिसाद दिला नाही असं त्यांनी सांगितले. तसेच मी याआधी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि नंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक झालो अशीही माहिती रमेश पाटील यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *