Navgan News



Add Space

क्राईममहाराष्ट्र

रात्री प्रवचन दिलं, सकाळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह, शेकडो तरुणांना व्यसनमुक्त करणाऱ्या देवेंद्र चैतन्य स्वामींचा मृत्यू…

Spread the love

Jalna News : जालन जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात शेकडो तरुणांना व्यसनमुक्त करून आध्यात्मिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे बालयोगी श्री देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलतबाबा (वय ४१) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर संस्थानात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

त्याचा मोबाईल गायब असणे, खोलीचा दरवाजा उघडा असणे आणि सीसीटीव्ही संदर्भातील तांत्रिक बाबींमुळे हा मृत्यू नेमका घातपात आहे की आत्महत्या, याबाबत मोठा संशय निर्माण झाला आहेत. पारध पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.
नक्की काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, श्री देवेंद्र चैतन्य स्वामी यांचे शनिवारी रात्री १०:३० वाजेपर्यंत गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवचन झाले. प्रवचन संपल्यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले. मात्र, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे भाविक आरतीसाठी आले असता महाराज मंदिरात आरतीला उपस्थित न राहिल्याने काहीजण त्यांच्या निवासस्थानाकडे गेले. तिथे पाहणी केली असता, स्वामींचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

पारध पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता धार्मिक विधीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तूर्तास पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी श्री देवेंद्र चैतन्य स्वामी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कुणीतरी त्यांची हत्या केली असावी, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचं भासवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असावा, असा संशय व्यक्तकेला जात आहे.

कारण मयत स्वामींचा मोबाईल फोन घटनास्थळावरून गायब आहे. एवढंच नव्हे तर ज्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला त्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. त्याचबरोबर घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र त्या कॅमेऱ्यांमध्ये केवळ एका तासाचेच रेकॉर्डिंग सेव्ह होत असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेसच फुटेज उपलब्ध झाले असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी अधिक फुटेज उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत.

सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा सर्व बाजुंनी तपास केला जात आहे. ही हत्या असेल तर यात जवळच्याच कोणत्या तरी व्यक्तीचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.