Navgan News



Add Space

ताज्या बातम्याशेत-शिवार

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देत मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा वाढदिवस यंदा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त हार-तुरे आणि औपचारिक शुभेच्छांपेक्षा समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्यावर भर देण्यात आला. नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी मंत्री छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी भुजबळ ब्रिगेड आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दोन कार्डियाक व सात ऑक्सिजन सुविधायुक्त अशा एकूण नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी १५० पाण्याच्या टाक्या आणि येवला तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म येथे विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक विविध पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छांच्या स्वरूपात आणलेल्या वह्या, पुस्तके, मेडिकल किट, दिव्यांगांसाठी आवश्यक साहित्य तसेच विविध समाजोपयोगी वस्तू स्वीकारल्या. या साहित्याचा गरजू विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि समाजातील वंचित घटकांना वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्याच्या या संकल्पनेतून समाजातील गरजू घटकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे, रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळवून देणे, विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे कमी करणे आणि रक्तदानातून रुग्णांना मदत करणे, अशा विविध उद्देशांनी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त १५० पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. या टाक्यांचे येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुलभ करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार असून, टंचाईच्या परिस्थितीत स्थानिक नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.ग्रामीण आणि गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने भुजबळ ब्रिगेड आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये दोन कार्डियाक रुग्णवाहिका आणि सात ऑक्सिजन सुविधायुक्त रुग्णवाहिकांचा समावेश आहे. हृदयविकारासारख्या गंभीर वैद्यकीय परिस्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचविणे महत्त्वाचे असते.तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या वाहतुकीसाठी सुविधायुक्त रुग्णवाहिकांची उपलब्धता उपयुक्त ठरते. या पार्श्वभूमीवर लोकार्पण करण्यात आलेल्या रुग्णवाहिका आरोग्यसेवेला बळ देणाऱ्या ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *