ओला, उबर आणि रॅपिडोसाठी नवीन धोरण येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा; १२ कोटी लोकांना रोजगार मिळणार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भन्नाट कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. विदेशात गेल्यावर गडकरी तेथील काही कल्पना घेऊन येतात आणि त्या देशातही लागू करतात. सध्या देशात रॅपिडो, ओला आणि उबर या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी देशात सर्वत्र आपला प्रसार केला आहे.
आता गडकरी यांनी या कंपन्यांसाठी नवीन योजना आखली आहे. यातून देशात १२ कोटी लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले.मंथनच्या वतीने महाल येथली गडकरींच्या निवासी आयोजित नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधर मेळाव्यात बोलताना गडकरींनी ही कल्पना सांगितली. काय आहे ही कल्पना पाहूया…
पदवीधर अवैध मत देतात दुर्दैवी बाब
पदवीधर म्हणजे सुशिक्षित आणि विद्वान व्यक्ती. अनेकांनी आचार्य पदवीही मिळवलेली असते. असे असतानाही पदवीधर मतदारसंघात तब्बल १२ हजार मते अवैध ठरतात, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आपल्याच सुशिक्षित वर्गाची हेटाळणी होते. हे टाळण्यासाठी पदवीधर मतदारांनी मतदानाची योग्य पद्धत समजून घेऊन वैध मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पदवीधर मतदारसंघातील मतदार सुशिक्षित आणि विद्वान असतानाही सुमारे १२ हजार मते अवैध ठरतात, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी मतदानाची योग्य पद्धत समजून घेऊन आपले मत वैध ठरेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठ वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत
शिक्षक आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर मंथन करणे, संशोधनाला चालना देणे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. ‘मंथन’ हा चांगला उपक्रम असून, त्याच्या माध्यमातून शिक्षक आणि प्राध्यापकांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये अनेकदा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र, शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे गडकरी म्हणाले. पदवीधर मतदारसंघातील सुधाकर कोहळे यांना पक्षाने संधी दिली असून गडकरी यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
शिक्षकांची जबाबदारी मोठी
भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागेल. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करता येते. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी समाजाच्या गरजा ओळखून संशोधन करणे आवश्यक आहे. ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षकांच्या कामाचा परिणाम संपूर्ण पिढीवर होत असतो. शिक्षकाकडून झालेली चूक संपूर्ण पिढीचे नुकसान करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आत्मीयता वाटेल, अशी शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शिक्षक, प्राध्यापक, संचालक, विद्यार्थी आणि पालक हे शैक्षणिक परिवाराचे घटक आहेत. या सर्वांमध्ये समन्वय साधून संस्कारक्षम आणि देशासाठी आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. बदलत्या काळानुसार ज्ञानाचे स्वरूप बदलत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणेही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
खासगी वाहनांमधून रोजगारनिर्मिती
कॅनडातील एका प्रवासादरम्यान निवृत्त संशोधक खासगी वाहन टॅक्सी म्हणून चालवून अतिरिक्त उत्पन्न मिळवत असल्याचा अनुभव गडकरी यांनी सांगितला. त्यातून खासगी वाहनांना टॅक्सी म्हणून मान्यता देण्याची कल्पना सुचल्याचे त्यांनी नमूद केले. २०१८ मध्ये परिवहनमंत्री असताना यासंदर्भात निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या व्यासपीठांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. १२ कोटी रोजगार मिळणार असल्याचे सांगून, अशा धोरणांचा विस्तार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.



