Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिका मुख्यालयात १५ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन

मुंबई : ग्रामीण भागातील कारागीर, लघुउद्योजक आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सभागृहनेते गणेश खणकर यांच्या हस्ते, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हे प्रदर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात खादीचे शर्ट, कुर्ते, जॅकेट, हातमागावर विणलेल्या साड्या, मध, साबण, तेल, कोल्हापुरी चप्पल, हाताने तयार केलेले दागिने तसेच महिला बचत गटांनी बनवलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पारंपरिक कला-कौशल्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि नित्यानंद पाटील उपस्थित होते. महापालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.

ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना अधिकाधिक ग्राहक मिळाल्यास ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. त्याचबरोबर पारंपरिक कला व कौशल्यांचे जतन होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांसह मुंबईकर नागरिकांनीही खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या वापराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन खणकर यांनी केले.

कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादी वापरावी!

खादी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील कारागीर व उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे, असे गणेश खणकर यांनी सांगितले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रे आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावेत, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *