मेरठ मध्ये धक्कादायक!पतीला गुंगीचं औषध देऊन बॉयफ्रेंडला घरी बोलवायची! पतीला संशय येताच त्याला संपवलं; दफन केलेला मृतदेह बाहेर काढताच ; पोलिसांनी पुढे काय केलं? वाचा…

(प्रातिनिधिक छायाचित्र)
मेरठ : Crime News – उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पतीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पत्नीविरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पत्नी इल्माला अटक करण्यात आली असून, तिचा कथित प्रियकर अमन याचा शोध सुरू आहे.
तालिब असे मृत व्यक्तीचे नाव असून तो 30 वर्षांचा होता. तो मुजफ्फरनगर जिल्ह्यातील रसूलपूर-डाभेडी गावाचा रहिवासी होता आणि गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. चार वर्षांपूर्वी त्याचे इल्माशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला 3 वर्षांची मुलगी आहे. ते मेरठमधील झाकीर नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. इल्मा जवळच्या ब्युटी सलूनमध्ये काम करत होती.
पोलिसांच्या तपासानुसार, सुमारे 13 महिन्यांपूर्वी इल्माची अमन नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क वाढला. पतीला झोप लागावी यासाठी इल्मा रोज त्याच्या जेवणात गुंगी आणणारे औषध मिसळत असल्याचा आरोप आहे. तालिबला या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. याच पार्श्वभूमीवर इल्मा आणि अमन यांनी हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरच्या रात्री तालिबला गुंगीचे औषध मिसळलेले जेवण देण्यात आले. त्यानंतर अमनला घरी बोलावण्यात आले आणि दोघांनी मिळून तालिबचा गळा आवळल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह दफन करण्यात आला.
मात्र, तालिबच्या मानेवरील संशयास्पद खुणांमुळे नातेवाईकांना शंका आली. दफन केल्यानंतर 9 दिवसांनी 8 ऑक्टोबर रोजी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी इल्माला अटक केली असून, अमनचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.



