किंग’मध्ये शाहरुखसोबत करीना कपूरही थिरकणार? खास गाण्यासाठी निर्मात्यांची मोठी तयारी, आंतरराष्ट्रीय गायकांचीही होणार एन्ट्री?

अभिनेता शाहरुख खानचा ‘किंग’ हा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसोबत सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि जयदीप अहलावत है कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
२४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, मात्र या चित्रपटाबाबत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करीना कपूरही ‘किंग’मध्ये झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करीना या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार असून, तिच्यावर एक खास नृत्यगीत चित्रित केले जाणार आहे.
‘डॅडी कूल’ असे या गाण्याचे नाव आहे.सचिन-जिगर या संगीतकार जोडीने या गाण्याला संगीत दिले असून, हे गाणे चित्रपटातील महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. शाहरुख आणि करीना यांची जोडी यापूर्वी ‘कभी खुशी कभी गम’, ‘अशोका’ आणि ‘रा.वन’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘डॉन’ आणि ‘बिल्लू’मध्येही करीनाने विशेष भूमिका केल्या होत्या.
दरम्यान, ‘किंग’मधील या खास गाण्यासाठी भारतीय कलाकारांसोबत आंतरराष्ट्रीय गायकांनाही सहभागी करून घेण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचे सांगितले जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.



