Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विठ्ठल मंदिर देणार मुख्यमंत्री निधीस दोन कोटी; समितीच्या बैठकीत निर्णय

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ही रक्कम सुपूर्द केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची विशेष सभा झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत पार पडलेल्या या बैठकीस कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक प्रवीणकुमार घम आदी उपस्थित होते.

एमटीडीसीचे पर्यटक निवास मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा करणे, आणि समितीच्या जमिनी व मालमत्तांच्या देखभालीसाठी सेवानिवृत्त नायब तहसीलदारांची ‘मालमत्ता अधिकारी’ म्हणून मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कार्तिकी यात्रेची तयारी

१० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त१४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेच्या धर्तीवरच कार्तिकीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी दर्शन रांग, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, सुरक्षा आणि तात्पुरत्या निवासाची उत्तम सोय केली जाणार आहे. याशिवाय शासकीय महापूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजा या परंपरेनुसार पार पाडण्याबाबत चर्चा झाली.

धूपारतीचे थेट प्रक्षेपण

प्रसार भारतीच्या ‘डब्ल्यूएव्हिइएस’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दैनंदिन धुपारतीचे विनामूल्य थेट प्रक्षेपण करण्यास सभेत मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *