
मुंबई : फ्लाईदुबईचे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच शौर्याची दखल घेत त्यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार ‘अशोक चक्र’ देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी केली आहे.
त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.
मूळचे मुंबईचे असलेले कॅप्टन स्मित मच्छार हे फ्लाईदुबईच्या FZ1073 या विमानात पायलट म्हणून ड्युटीवर होते. यावेळी त्यांच्या सह-वैमानिकानेच त्यांच्यावर हल्ला करत विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. पण अशा भयानक परिस्थितीतही त्यांनी हिंमत हारली नाही. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी विमानात असलेल्या १७४ प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आणि आपलं कर्तव्य चोख बजावलं.
खासदार कार्तिकेय शर्मा यांनी पत्रात म्हटलंय की, संकटाच्या वेळी कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले धैर्य भारतीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या वेदना विसरून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ते ढाल बनून उभे राहिले. अशा शूर व्यक्तीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान केल्यास त्यांच्या शौर्याची योग्य दखल घेतली जाईल, शिवाय देशातील तरुणांनाही यातून मोठी प्रेरणा मिळेल. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना ‘अशोक चक्र’ देण्याचा विचार करावा, अशी विनंती शर्मा यांनी पंतप्रधानांना केली आहे.
असा उधळून लावला हायजॅकचा कट
३० सप्टेंबर रोजी फ्लाईदुबईच्या FZ1073 या विमानात हा थरार घडला होता. ओमानचा सह-वैमानिक हम्माम अल-हम्मामी याने कॉकपिटमध्येच भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. विमान क्रॅश करण्याच्या आणि हायजॅक करण्याच्या उद्देशाने त्याने हा जीवघेणा हल्ला केला होता.
गंभीर जखमी होऊनही कॅप्टन मच्छार यांनी मोठ्या शिताफीने कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे विमानात असलेले प्रवासी आणि ऑफ-ड्युटी क्रू मेंबर्स आत येऊ शकले आणि त्यांनी हल्लेखोराला पकडून ठेवलं. या झटापटीत विमान अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १६,००० फूट खाली आलं होतं. त्यानंतर लगेचच हायजॅकिंगचा इमर्जन्सी सिग्नल पाठवण्यात आला. अखेर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील ताबुक येथे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सुदैवाने विमानातील सर्व १८० जण सुखरूप बचावले.



