
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात केलेली वाढ आणि महागाईच्या अंदाजात केलेली वाढ याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर बुधवारी दिसून आला.
व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे बाजाराची सुरुवातच कमजोरीने झाली. सुरुवातीच्या एका तासानंतर खरेदीदारांनी बाजार सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तेजी फार काळ टिकली नाही. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी लाल निशाण्यावर राहिले. दिवसअखेर सेन्सेक्स ४२९.११ अंक म्हणजेच ०.५९ टक्क्यांनी घसरून ७२ हजार ६३८.७० अंकांवर, तर निफ्टी १७३.०५ अंक म्हणजेच ०.७६ टक्क्यांनी घसरून २२ हजार ६०३.०५ अंकांवर बंद झाला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३.७६ लाख कोटी रुपयांची घट झाली.
बीएसईचा सेन्सेक्स १०२.४३ अंकांच्या घसरणीसह ७२ हजार ९६५.३८ अंकांवर खुला. सुरुवातीला विक्रीचा दबाव वाढल्याने तो ७२ हजार ५२०.७३ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने सेन्सेक्सने काहीशी सुधारणा नोंदवली आणि दुपारी १२ वाजेपर्यंत तो ७३ हजार १८.८२ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर पुन्हा विक्रीचा जोर वाढला. परिणामी सेन्सेक्स ५९९.०९ अंकांच्या घसरणीसह ७२ हजार ४६८.७२ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अखेरच्या टप्प्यात झालेल्या खरेदीमुळे त्याने नीचांकी पातळीवरून काहीशी सुधारणा केली आणि ४२९.११ अंकांच्या घसरणीसह ७२ हजार ६३८.७० अंकांवर व्यवहाराची सांगता केली.
निफ्टीची सुरुवातही ८५.६५ अंकांच्या घसरणीसह २२ हजार ६९०.४५ अंकांवर झाली. सुरुवातीच्या विक्रीमुळे तो २२ हजार ५७८.२५ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर झालेल्या खरेदीमुळे दुपारी १२ वाजता निफ्टी २२ हजार ७१७.६५ अंकांपर्यंत सावरला. मात्र त्यानंतर पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने निफ्टी २२ हजार ५४६.३० अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अखेरच्या टप्प्यातील खरेदीमुळे त्याने काहीशी सुधारणा करत १७३.०५ अंकांच्या घसरणीसह २२ हजार ६०३.०५ अंकांवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मीडिया आणि पीएसयू बँक वगळता बहुतांश निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मेटल क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली. बीएसई मेटल निर्देशांक २.४६ टक्क्यांनी घसरला. कन्झ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक १.८३ टक्के, निफ्टी ऑटो निर्देशांक १.५८ टक्के आणि आयटी निर्देशांक १.३४ टक्क्यांनी घसरले. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि पीएसयू क्षेत्रातील निर्देशांकही लाल निशाण्यावर बंद झाले.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४७४.७५ लाख कोटी रुपयांवरून घटून ४७०.९९ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ३.७६ लाख कोटी रुपयांची घट झाली. दिवसाच्या व्यवहारात कोटक महिंद्रा बँक, बीएसई लिमिटेड, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि कोल इंडिया हे प्रमुख तेजीचे शेअर ठरले. दुसरीकडे टायटन कंपनी, अदानी एंटरप्रायझेस, हिंडाल्को इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.



