Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘ऊर्जा’; शेकडोंच्या उपस्थितीत ‘गोवा रक्षण यात्रे’ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

कॉंग्रेस पक्षाचा तळागाळात शाबूत असलेला विचार जागृत करत त्याचे आगामी निवडणुकीत मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने आता नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. गोवा रक्षण यात्रेच्या नावाने जनजागृती करण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली पणजी आणि ताळगावातून आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य फेरी काढण्यात आली. विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. तब्बल २७ दिवस चालणाऱ्या या यात्रेत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, तसेच कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

पणजीतील आंबेडकर उद्यानापासून आज सुरू झालेली यात्रा सायंकाळी ताळगावमध्ये पोचली. रात्री १०० कार्यकर्ते तेथे मुक्कामी राहणार असून उद्या सकाळी ही यात्रा कुंभारजुवेच्या दिशेने रवाना होईल. आज दुपारी चारच्या सुमारास कदंब बसस्थानकाजवळील उद्यानात काँग्रेस नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले आणि यात्रेला सुरुवात झाली.

यात्रेत गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर, महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप, एम. के. शेख, खजिनदार दत्ता नायक, समील वळवईकर, राजेश वेरेकर, तुलियो डिसोझा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

गेल्या चार वर्षांत कॉंग्रेसपासून दुरावलेले नेते-कार्यकर्त्यांना या यात्रेच्या निमित्ताने जवळ आणण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या उपस्थितीने कॉंग्रेसने वातावरण निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. आता कॉंग्रेसला हा वेग आणि उत्साह टिकविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. विशेषतः भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांत स्वपक्षाची ताकद दाखवण्याची संधी कॉंग्रेस घेणार का, याचे उत्तर या यात्रेच्या निमित्ताने मिळणार आहे.

पणजी शहराचा वारसा जोपासला जाईल. पणजी शहराची जी ‘कॅसिनो सिटी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे, ती पुसली जाईल. त्यासाठी शहर कॅसिनोमुक्त केले जाईल, अशी हमी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज दिली. यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांनी खास यात्रेसाठी तयार केलेले टी-शर्ट परिधान केले होते. कार्यकर्ते, महिलांच्या हाती काँग्रेसचा झेंडा, तसेच गोवा रक्षण यात्रा आणि विविध आश्वासनांचे, भाजपने केलेल्या कथित घोटाळ्यांचे फलक होते. याशिवाय एलईडी स्क्रिन बसविलेले वाहन, तसेच यात्रेसमोर ढोल-ताशांचा निनाद सुरू होता.

याप्रसंगी युरी आलेमाव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवरून हटविण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जागृती व्हावी, सरकारविरोधातील जनमत काँग्रेसकडे झुकले जावे यासाठी काँग्रेसच्या वतीने आजपासून राज्यभर गोवा रक्षण यात्रेस सुरुवात केली आहे. २७ दिवसांत ४० मतदारसंघांत जाणारी ही यात्रा लोकसंपर्क वाढविण्याबरोबर काँग्रेस जनमानसात चांगली प्रतिमा आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

आज सकाळी काँग्रेस भवनबाहेर सेवा दलाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. पणजी बसस्थानक, मार्केट परिसरात यात्रेविषयीची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वितरण करण्यात आले. यात राजन घाटे, सुरेंद्र फुर्तादो, ॲड. वरद म्हार्दोळकर, ज्ञानेश्वर गोवेकर यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

ताळगावात मुक्काम

आंबेडकर उद्यानातून यात्रेला सुरुवात झाली. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरून यात्रा जुन्या सचिवालयापर्यंत आली. सचिवालयाच्या मागील रस्त्यावरून ती चर्चकडे आणि तेथून आत्माराम बोरकर मार्गमार्गे सांतिनेज येथील विवांता चौक आणि तेथून ताळगावकडे रवाना झाली. ताळगाव चर्चसमोरील वाहन तळावर कार्यकर्त्यांनी नियोजनाप्रमाणे मुक्काम केला. उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी ‘व्हिवा गोवा’च्या समूहाने, तसेच गायिका हेमा सरदेसाई यांनी गीतांचे सादरीकरण केले. ज्ञानेश्वर गोवेकर हे ताळगावातील यात्रेचे संयोजक म्हणून काम पाहत होते.

अमित पाटकरांची यात्रेकडे पाठ

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना या यात्रेचे निमंत्रण दिले होते. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी पाठविलेले निमंत्रण मिळाल्याचेही पाटकर यांनी मान्य केले. मात्र, आज यात्रेच्या प्रारंभी त्यांची अनुपस्थिती दिसून आली. असे असले, तरी ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे पक्षाच्या नेत्यांनीच जाहीर केले आहे. शिवाय पाटकरांनीही आपल्या काळजात काँग्रेस असल्याचे वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीत सांगितले आहे. यावरून आता पाटकर नेमक्या कोणत्या मतदारसंघातील यात्रेत सहभागी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पणजीत वाहतूक कोंडी

मंगळवारी दुपारपासूनच काँग्रेस कार्यकर्ते आंबेडकर उद्यानात जमू लागले. त्यामुळे मांडवी पुलाकडे आणि कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना दिवजा सर्कलकडून पुढे हिरा पेट्रोल पंपकडे जाऊन पणजी शहरात यावे लागले. दिवजा सर्कलकडेही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कदंब बसस्थानकाकडून पणजी शहरात जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. यात्रा जेव्हा सुरू झाली, तेव्हा काही काळ पणजीत येणारी वाहतूक बंद ठेवावी लागली. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरून यात्रा एका बाजूने शहराकडे निघाली, तेव्हा एक वाहन जाईल एवढे अंतर ठेवून यात्रेकरू चालत होते.

वालंका, वॉरेनचा आज कॉंग्रेस प्रवेश : कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल हे उद्या (ता. २३) कुंभारजुवे- प्रियोळ मतदारसंघातील यात्रेत सहभागी होतील. या यात्रेदरम्यान कुंकळ्ळी येथे वालंका आलेमाव आणि वॉरेन आलेमाव यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या यात्रेदरम्यान पक्ष प्रवेशाचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *