Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पितृपक्षात कुशावर्तावर खोदकाम; त्र्यंबकेश्वरमध्ये श्राध्दविधी कुठे करणार?

पितृपक्षानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पितृपक्षात तर्पण, पिंडदान, श्राध्द असे विधी केले जातात. हे विधी होणाऱ्या कुशावर्तसह अन्य ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आल्याने हे विधी कुठे करायचे, असा प्रश्न भाविक आणि पुरोहित या दोघांसमोर आहे.

सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी कुशावर्तावरील कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असल्या तरी ही कामे पूर्ण होणार का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्राध्दविधीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. पितृ पक्षातील श्राध्द विधीसह तर्पण, त्रिपिंडी विधी या ठिकाणी होतात. गणेश विसर्जनानंतर पितृपक्षाला सुरूवात होईल. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण होणार आहे. सध्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील कोठी कार्यालयाकडे जाणारा रस्ता, मंदिरासमोरील गल्ली, संत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणारे रस्ते, पाटणकर संकुल परिसर, आखाड्यांकडे जाणारे रस्ते, गौतम तलाव, इंद्रतीर्थ आणि मुकूंद तलाव, बिल्वतीर्थ या ठिकाणी सुशोभिकरणाचे काम करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासमोरील रस्ताही खोदण्यात आला आहे. भाविकांसाठी सर्वाधिक महत्वाच्या असलेल्या कुशावर्त परिसरातही मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.

कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता

सोमवारी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वरची पाहणी करुन काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी ध्वजारोहणापर्यंत ही कामे होतील की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी स्थानिक रहिवासी संजय हराळे यांनी प्रतिक्रिया दिली. पितृपक्षात मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. खोदकामामुळे कुशावर्तावर श्राध्द विधीसाठी लोकांना रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. महिलांना वस्त्रांतर करण्यासाठी जागा नाही. गावातील कोणाचे निधन झाल्यास स्मशानभूमीपर्यंत रुग्णवाहिका किंवा मोठे वाहन जावू शकत नाही. कुशावर्तात पुरातत्व विभागाकडून होत असलेल्या कामातील संथपणा पाहता वेळेत काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे पितृपक्षासाठी येणाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे हराळे यांनी नमूद केले.

खोदकामाने अनेक अडचणी…

त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. याविषयी स्थानिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही. ध्वजारोहणापूर्वी ही कामे पूर्ण होणार नाहीत. कामाच्या दर्जाविषयीही साशंकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमर सोनवणे यांनी सांगितले. पितृ पक्षातील विधींना अडचणी येतील, असे पुरोहितांचे म्हणणे आहे. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी, कुशावर्तातून हात, पाय धुवून बाहेर पडण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *