
राज्यशासनाने हॉटेल्स आणि मिठाईची दुकाने यांनी ‘मिल्क ॲनालॉग’चा वापर केला असल्यास तसे घोषित करणे अनिवार्य केले आहे.
याविषयी २२ सप्टेंबर या दिवशी अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका श्वेता देसाई यांनी या क्षेत्रातील व्यावसायिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला दुग्धजन्य पदार्थांचे व्यापारी, वितरक, केटरर्स (भोजन व्यवस्थापक), उपाहारगृहे यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘मिल्क ॲनालॉग’च्या वापराविषयीच्या नियमांची कार्यवाही करण्यासाठी ४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नियमांचे पालन न करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
याआधी उपाहारगृहांमध्ये पनीर वापरून केल्या जाणार्या पदार्थांमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पेढा, मिल्क केक, बर्फी यांसारख्या पारंपरिक मिठाईमध्ये खवा, मावा किंवा कलाकंद यांच्याऐवजी कृत्रिम पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आले होते. दुधापासून बनवलेल्या अस्सल पदार्थांऐवजी कृत्रिम पर्यायांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणे, हे कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे अस्सल दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली बनावट आणि कृत्रिम ‘ॲनालॉग’ पदार्थांची विक्री करणार्या अन्न व्यावसायिकांसाठी नवीन नियमावली प्रसारित करण्यात आली होती. या नियमांनुसार आस्थापनांनी कर्मचारी, आचारी आणि अन्न हाताळणारे कर्मचारी यांना ‘ॲनालॉग’ पदार्थ ओळखण्याचे प्रशिक्षण देणे, पुरवठादारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि चीज ‘ॲनालॉग’चा पनीर म्हणून वापर करणे पूर्णपणे बंद करणे बंधनकारक आहे.
ग्राहकांचा विचार करून सरकारकडून नियमावली जारी
ॲनालॉग सिद्ध करतांना नैसर्गिक दुधाच्या फॅटऐवजी हायड्रोजनेटेड वनस्पती फॅट वापरले जाते. हे पदार्थ शीतगृहाविना वाहून नेले जातात, तसेच हे पदार्थ अस्सल पनीरप्रमाणे योग्य पोषणमूल्ये देत नाहीत. त्यामुळे प्रथिनांसाठी पनीरवर अवलंबून असणार्या शाकाहारी ग्राहकांची हानी होते. याचा विचार करून सरकारने ही नियमावली प्रसारित केली होती.
पदार्थांविषयी ग्राहकांना माहिती देणे बंधनकारक
१. अन्नपुरवठा करणार्या आस्थापनांनी डिस्प्ले ट्रे (प्रदर्शन थाळी), कक्ष आणि मेन्यू कार्ड (खाण्याच्या पदार्थांची सूची असलेले पत्रक) यांवर ‘पदार्थ दुधापासून बनवलेला आहे कि ‘मिल्क ॲनालॉग’ वापरलेला आहे’, याचा स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य आहे.
२. दुधाच्या पर्यायी (ॲनालॉग) पदार्थांचा वापर करणार्या आस्थापनांनी दुकानावर स्पष्ट दिसणारा फलक लावणे आवश्यक आहे. त्यावर ‘हा पदार्थ बनवण्यासाठी प्रामुख्याने ‘मिल्क ॲनालॉग’चा वापर करण्यात आला आहे’, असे लिहिणे आवश्यक आहे.



