
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रामकुंडासह शहरात चाललेल्या विविध कामांचा परिणाम गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणार असल्याचे चित्र आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक पंचवटी कारंजा येथे समाप्त होणार आहे.
तिथून पूजेच्या लहान मूर्ती घेऊन निवडक कार्यकर्ते गोदावरी काठाकडे जातील. मोठ्या मूर्तींसह वाहने निमाणीमार्गे पुढे मार्गस्थ होतील, अशी माहिती नाशिक गणेशोत्सव महामंडळाने दिली आहे. यावेळी विसर्जन रामकुंडाऐवजी म्हसोबा पटांगण परिसरात होणार आहे. दुसरीकडे मुख्य मिरवणुकीतील राजकीय प्रभाव, संथपणा, त्यामुळे मंडळाच्या संख्येवर होणारा परिणाम याचीही चर्चा होत आहे.
नाशिकची मुख्य विसर्जन मिरवणूक वाकडीबारवपासून नेहमीप्रमाणे सुरू होऊन मेनरोड-एम.जी. रोड-अशोक स्तंभ-रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजा येथे येईल. दरवर्षी मिरवणूक पंचवटी कारंजा चौकातून कपालेश्वरमार्गे रामकुंडाकडे येत असते. यंदा मात्र कुंभमेळ्याच्या कामामुळे पटांगणावर जाण्यासाठी रस्ते नसल्याने आणि मूर्ती मोठ्या असल्याने तेथे विसर्जन शक्य नाही. त्यामुळे पंचवटी कारंजा येथे मिरवणूक समाप्त करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. लहान पूजेच्या मूर्ती मंडळाचे निवडक कार्यकर्ते घेऊन गोदा काठाकडे जातील.
मोठ्या गणेश मूर्ती निमाणीमार्गे महामार्गाकडे मार्गस्थ होतील, असे नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी सांगितले. विसर्जन स्थळाकडे जाणारे रस्ते आणि खड्ड्यांची स्थिती पाहता प्रशासनाकडून अल्पावधीत काम होणे शक्य नसल्याने गणेश मंडळांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. दंडे हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक, माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी या वर्षी रामकुंडावरील खोदकामामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन म्हसोबा पटांगण परिसरात करण्याचे ठरल्याचे सांगितले.
या वर्षी मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत २६ मंडळे असतील. गेल्या वर्षी ही संख्या ३५ होती. निवडणूक वर्षात मंडळांची संख्या वाढते, असा दाखला नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी दिला. नाशिकमध्ये मुख्य मिरवणुकीत गणेश मंडळांची संख्या कमी होण्यामागे वेगवेगळ्या भागात स्वतंत्रपणे निघणाऱ्या मिरवणूका हे कारण आहे. सातपूर, सिडको, नाशिकरोड भागात त्या, त्या परिसरातील मंडळांची स्वतंत्र मिरवणूक निघते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्य मिरवणुकीत मध्यवर्ती भागातील गणेशोत्सव मंडळे प्रामुख्याने सहभागी होतात. असेही ते म्हणाले.
मिरवणुकीवरील राजकीय प्रभाव
मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांची संख्या मागील काही वर्षात कमी होत आहे. मिरवणुकीत बड्या राजकीय नेत्यांच्या मंडळांचा समावेश असतो. क्रमांकाच्या चढाओढीत त्यांची मंडळे पुढे असतात. मिरवणुकीवर राजकीय प्रभाव असल्याने त्यांची मंडळे अतिशय संथपणे पुढे सरकतात. प्रत्येक चौकात राजकीय पक्ष, संस्था व संघटनांतर्फे केल्या जाणाऱ्या स्वागतात बराच कालापव्यय होतो. यामुळे अखेरच्या क्रमांकांवरील मंडळांना मिरवणुकीत सहभागी होण्याचा आनंदही मिळत नसल्याने हळूहळू काही मंडळे यातून बाहेर पडल्याचे दिसून येते.
पोलिसांकडून सूचना
यंदाची गणेश विसर्जन कुठेही रेंगाळू देऊ नये, अशी सूचना पोलीस यंत्रणेने मंडळांसमवेतच्या संयुक्त बैठकीत दिली आहे. ढोल पथकात ६० ते ७० लोक असतील. वाहने कमी असतील तर मिरवणूक लवकर पुढे जाईल. त्यामुळे मंडळांच्या वाहन संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक वाहने नको, असेही स्पष्ट करण्यात आले. मिरवणूक पुढे घेण्यासाठी प्रत्येक मंडळाला स्वयंसेवकांची नेमणूक करण्यास सांगण्यात आले आहे.



