
राज्यातील महापालिकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांना महापालिका कारभाराचे धडे देण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २९ व ३० सप्टेंबर रोजी मीरा-भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ही दोन दिवसीय कार्यशाळा होणार आहे.
महापालिका निवडणुकांनंतर मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून शहरांचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविण्याच्या दृष्टीने पक्षाने प्रशिक्षणावर भर दिला आहे. यापूर्वीही विविध महापालिकांमधील भाजप नगरसेवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले असून, त्यामध्ये सभागृहाचे कामकाज, प्रशासकीय विषय, विकासकामे, नागरिकांशी संवाद, पक्षाची कार्यपद्धती आणि शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आता राज्यातील महापालिकांसोबतच पिंपरी चिंचवड महापालिकेमधील भाजपच्या नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. महापालिकेचे नियम, सभागृहातील कामकाज, प्रश्न मांडण्याची पद्धत, अर्थसंकल्प, विकासकामांचा पाठपुरावा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रशासनाशी समन्वय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याची पद्धत, अशा विविध विषयांवर नगरसेवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, नगरसेवक हा केवळ पक्षाचा प्रतिनिधी नसून आपल्या प्रभागातील नागरिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्यामुळे नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे, यावरही कार्यशाळेत भर दिला जाणार आहे.
यापूर्वी झालेल्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये लोकप्रतिनिधींनी पदाचा वापर केवळ राजकीय भूमिकेसाठी न करता जनहिताला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला होता. तसेच महापालिका प्रशासन, विकासकामे आणि पक्ष संघटना यामध्ये समन्वय राखण्यावरही भर देण्यात आला होता.
‘नगरसेवकांची शाळा’ चर्चेत
या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि चव्हाण यांच्या उपस्थितीत होणारी ही कार्यशाळा विशेष चर्चेचा विषय ठरणार आहे. नगरसेवकांना केवळ पक्षाची भूमिका समजावून न देता महापालिका चालविताना नेमके काय करावे आणि काय टाळावे, याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने या कार्यशाळेकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
विशेषतः महापालिकेच्या सभागृहात प्रभावीपणे प्रश्न मांडणे, प्रशासनाकडून माहिती मिळविणे, विकासकामांचा दर्जा आणि प्रगती तपासणे, नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा करणे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडणे, याबाबत या प्रशिक्षणातून नगरसेवकांना दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
पदाधिकाऱ्यांचे कान टोचणार ?
नगरसेवकांना केवळ राजकीय भूमिका मांडण्याऐवजी सभागृहाच्या नियमांची माहिती असणे, विषयाचा अभ्यास करून प्रश्न मांडणे, प्रशासनाकडून योग्य माहिती मिळविणे आणि विकासकामांवर लक्ष ठेवणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यातच निवडणूक झाल्यापासून पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी या ना त्या कारणाने चर्चेत आहे. भ्रष्टाचार, अनियमितता यामुळे सत्ताधारी अडचणीत येत आहेत. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे कान टोचले जाण्याची शक्यता आहे.
प्रभागातील प्रश्न’ ते ‘शहराचा अजेंडा’
पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांसमोर केवळ त्यांच्या प्रभागापुरते प्रश्न नसून संपूर्ण शहराच्या विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान आहे. शहराचा विस्तार, नव्याने विकसित होणाऱ्या भागातील मूलभूत सुविधा, जुन्या भागातील वाहतूक व पायाभूत सुविधांचे प्रश्न आणि औद्योगिक शहराची ओळख कायम ठेवत आधुनिक नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे.



