Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

इंदापूरच्या स्वीकृत जिल्हा परिषद सदस्यपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार फिल्डिंग; भरणेंसमोर समाजनिहाय समीकरणांचे आव्हान

जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, इंदापूर तालुक्यातून स्वीकृत सदस्यपद आपल्यालाच मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे धनगर, माळी की मराठा समाजाला संधी देणार याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातून ८ सदस्य प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये ओबीसी प्रवर्गातून मेघना तुकाराम बंडगर, सोनाली तुषार जाधव व श्रीमंत पोपट ढोले तर सर्वसाधारण प्रवर्गातून यशराज आप्पासाहेब जगदाळे, हर्षदा दीपक जाधव व अंकिता हर्षवर्धन पाटील तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून निर्मला सागर मिसाळ व माधुरी सागर भिसे यांचा समावेश आहे. यामध्ये मराठा समाजातून अंकिता हर्षवर्धन पाटील यांना जिल्हा परिषदचे महिला बाल कल्याण विभागाचे सभापतिपद देण्यात आले असून, ओबीसी समाजातून श्रीमंत पोपट ढोले यांना गटनेता पद देण्यात आले आहे.

सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या संख्येने सोडून गेलेले व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दाखल झालेले माळी, मराठा व धनगर समाजातील प्रमुखांना जिल्हा परिषद व पंचायत समितीला आपल्याला उमेदवारी मिळेल, ही आशा आहे. परंतु, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वाढलेल्या गट व गणामुळे आरक्षणामध्ये देखील मोठा फेरबदल झाला.

यामुळे या नेते मंडळीची मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाने व नेतृत्वाने दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे निवडणूक काळामध्ये काम करून त्यांना निवडून आणण्याचे देखील काम केले आहे. परंतु, यामध्ये प्रामुख्याने वालचंदनगर गटातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे संचालक व माळी समाजातील प्रमुख मानले जाणारे वसंत मोहोळकर तसेच भिगवण गटातून मराठा समाजातील तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व कर्मयोगीचे संचालक पराग रमेश जाधव यांची राजकीय कोंडी झाली.

यामुळे आता तरी जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यांसाठी प्रताप पाटील, वसंत मोहोळकर व पराग जाधव या वेगवेगळ्या समाजातील प्रमुख नेत्यांना संधी मिळणार की अन्य कोणत्या समाजाला संधी मिळणार याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे जरी लक्ष लागले आहे. असे असले तरी इंदापूर तालुक्यातील एका स्वीकृत सदस्यांची निवड करताना मराठा, धनगर आणि माळी या तीन मतदारसंख्या असलेल्या समाजातील नेत्याला संधी देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या वेळी प्रताप पाटील, वसंत मोहोळकर व पराग जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पक्ष व नेतृत्वाने स्वीकृत सदस्यपदाची संधी दिली तर आनंदच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *