उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पहिल्याच कार्यक्रमावर विघ्न; राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील शिबीर रद्द

दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेले राज्यव्यापी शिबिर राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांत पावसाच्या अभावामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली असल्याने पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलण्यात येत असल्याचे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
राज्य शासनाकडून दुष्काळाच्या संकटाचा आढावा घेतला जात आहे. १९ जिल्ह्यातील पीक व चारा पाणी परिस्थिती काळजीची असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शिबीर पुढे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घ्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार पार्थ पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी त्याबाबतचा निर्णय जाहीर केला.
या राज्यव्यापी शिबिरासाठी सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महानगर प्रदेशातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. या विचारमंथन शिबिरात तरुणाईचा (जेन-झी) मुद्दा आणि पक्षाच्या आगामी अजेंड्याबाबत व्यापक चर्चा होणार होती. तसेच पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विचारांची आणि वारशाची मोट बांधून तरुणाईला जोडण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार होता. दुष्काळी स्थितीत हे शिबिर घेतल्यास जनतेत नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता असल्याने नियोजन लांबणीवर टाकण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा पहिलाच राज्यव्यापी कार्यक्रम होणार होता. या शिबीराची तयारी जोरदार करण्यात येत होती. अनेक नव्या निवडी, नवे संकल्प व पक्षाची दिशा यासंदर्भात घोषणा या शिबीरात करण्यात येणार होत्या. पक्षात सध्या शैथिल्य आले आहे. त्यातच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या शिबीराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे, हा या शिबीराचा हेतू होता.



