मांजरा नदीचे १२५ किलोमीटर पात्र कोरडे ; दुष्काळाच्या झळा; ३५ उच्च पातळी बंधाऱ्यांत केवळ चार टक्के पाणी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर अंतराचे पात्र आता कोरडे पडले आहे. मांजरा नदीसह तेरणा, रेणा, तिरू नदीवर बांधण्यात आलेल्या एकूण ३५ उच्च पातळीवरील बंधाऱ्यातील (बॅरेजेस) पाणीसाठा केवळ ४.७६ टक्के आहे.
भविष्यात दुष्काळाच्या झळा काय राहणार हे या नद्यांच्या पात्राकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर या बंधाऱ्यात केवळ पाण्याऐवजी केवळ खडक दिसत आहे.
पाण्याअभावी शेती अडचणीत
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर उच्च पातळीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. बारमाही पाणी त्यात साठवून ठेवता यावे म्हणून शासनाने ही उपाय योजना केली आहे. पण, या वर्षी नदीपात्रात पाणी येईल असा पाऊसच झाला नाही. शेतातून पाणी बाहेर पडलेच नाही. त्यामुळे पावसाळा संपला तरी नदीपात्रात पाणी आलेच नाही. परिणामी बंधाऱ्यात पाणीसाठा झाला नाही. पाण्याअभावी शेती अडचणीत आली आहे.
बंधाऱ्यातील पाणीसाठा चिंताजनक
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा नदीच्या १२५ किलोमीटरच्या पात्रात १५ बंधारे उभारण्यात आले आहेत. या सर्व बंधाऱ्यांत एकूण पाणीसाठा केवळ ५.७६ टक्के इतकाच आहे. यातही भुसणी बंधाऱ्यात ७५ टक्के, टाकळगाव देवळा बंधाऱ्यात ३१ टक्के पाणीसाठा राहिला आहे. नागझरी, शिवणी, बिंदगीहाळ, कारसा पोहरेगाव, वांगदरी, बोरगाव अंजनपूर हे बंधारे तर कोरडे पडले आहेत. उर्वरित बंधाऱ्यात दहा टक्केपेक्षा देखील कमी पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे या नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांतील हजारो हेक्टर सिंचनाला मोठा फटका बसला आहे.
तेरणा कोरडी, रेणा,तिरूतही पाणी कमी
जिल्ह्यात तेरणा नदीवर एकूण ९ उच्च पातळीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचा प्रकल्पीय एकूण पाणीसाठा ११.७८ दशलक्ष घनमीटर आहे. पण, चार महिने झाले मोठा पाऊसच न झाल्याने या बंधाऱ्यात पाणीच आलेले नाही. सध्या हे बंधारे कोरडे पडले आहेत. रेणा नदीवरील चार बंधाऱ्यांत १७.३ टक्के पाणीसाठा राहिला आहे. तर तिरू नदीवरील सात बंधाऱ्यांत केवळ ४.७ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांची परिस्थिती देखील चिंताजनक राहणार आहे.
मांजरा नदी
- एकूण उच्च पातळीचे बंधारे १५
- प्रकल्पीय एकूण पाणीसाठा ६४.८४६(दलघमी)
- सध्याचा पाणीसाठा ३.४३ (दलघमी)
- पाणीसाठ्याची टक्केवारी ५.३ टक्के
तेरणा नदी
- एकूण उच्च पातळीचे बंधारे ०९
- प्रकल्पीय एकूण पाणीसाठा ११.७८ (दलघमी)
- सध्याचा पाणीसाठा शून्य
- पाणीसाठ्याची टक्केवारी शून्य
रेणा नदी
- एकूण उच्च पातळीचे बंधारे ०४
- प्रकल्पीय एकूण पाणीसाठा १.१७ (दलघमी)
- सध्याचा पाणीसाठा ०.१५ (दलघमी)
- पाणीसाठ्याची टक्केवारी १७.३ टक्के
तिरु नदी
- एकूण उच्च पातळीचे बंधारे ०७
- प्रकल्पीय एकूण पाणीसाठा ८०.०२ (दलघमी)
- सध्याचा पाणीसाठा ३.७७ (दलघमी)
- पाणीसाठ्याची टक्केवारी ४.७ टक्के



