अमित शाहांच्या भेटीनंतर Mangesh Chivte यांची दिल्लीवारी? पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारीच्या चर्चेला वेग

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी दावे केले जात असल्याने उमेदवारीचा निर्णय महायुतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांकडून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगेश चिवटे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. हुबळी दौऱ्यात चिवटे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चिवटे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला आता अधिकच महत्त्व आले आहे.
दरम्यान, चिवटे यांना पुढील आठवड्यात दिल्लीला बोलावण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील या संभाव्य भेटीत उमेदवारीबाबत काही महत्त्वाची चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेला मिळावी, यासाठी मंगेश चिवटे प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या जागेवर दावा केला जात असल्याने जागावाटपाचा निर्णय सहज होणार नसल्याचे चित्र आहे.
आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुतीत नेमका कोणाचा दावा मान्य होतो आणि मंगेश चिवटे यांची अमित शाहांसोबतची भेट त्यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने किती निर्णायक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



