60 पैकी 55 नगरसेवकांचा पाठिंबा, नंबर असूनही भाजपचा गेम; अपक्ष उमेदवार विजयी, मग मोदींचा जयजयकार

संख्याबळ बाजूनं असताना, पूर्ण बहुमत गाठीशी असतानाही भाजपला जबरदस्त झटका बसला आहे. नंबर असतानाही भाजपचा झालेला गेम सध्या डेअरीवाल्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. दूध उत्पादन आणि डेअरी उद्योगामुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील दोन प्रमुख नगर परिषदांमध्ये बहुमत असूनही भाजपच्या हातून उपसभापतीपद गेलं आहे. नागौर नगर परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोहम्मद शरीफ कुरेशी यांनी बाजी मारली. त्यांनी भाजप उमेदवाराचा ५ मतांनी पराभव केला. नागौर नगर परिषदेत एकूण ६० जागा आहेत. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला ५५ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ५ मतं मिळाली. बहुमतामुळे भाजपनं सभापतीपद अगदी सहज मिळवलं. पण मंगळवारी झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरण बदललं.
उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिवकुमार ऊर्फ मीकू राव यांना अपक्ष उमेदवार मोहम्मद शरीफ कुरेशी यांनी आव्हान दिलं. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचं संख्याबळ दिसून आलं होतं. त्यामुळे मीकू राव यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण कुरेशी यांनी राव यांचा ५ मतांनी पराभव केला. राव यांना २७, तर कुरेशी यांना ३२ मतं मिळाली.
सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार मीकू राव हे प्रदेश उपाध्यक्षांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र तरीही मीकू राव यांचा उपसभापती पदाच्या निवडणुकीत पराभव झाला आणि अपक्ष उमेदवारानं विजय साकारला. विजयानंतर मोहम्मद कुरेशी यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवाराच्या विजयानंतर भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा जयजयकार केला.
नागौर जिल्ह्यातील मुंडवा नगरपालिकेतही भाजपला पूर्ण बहुमत असूनदेखील धक्का बसला. उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला शून्य मतं मिळाली. राजस्थान भाजप प्रदेश उपाध्यक्षाचे खासगी सल्लागार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी १२ मतं घेतली. काँग्रेस आणि आरएलपीनं त्यांचं पॅनल तयार केलं. भाजपच्या अधिकृत उमेदवाराला भोपळाही फोडता आला नाही.



