शेणखताचा डोस आणि स्लरीची फवारणी ठरली प्रभावी; तब्बल ७२ टन डाळिंब उत्पादन अन् ६० लाखांची कमाई

कन्हेरगाव (ता. माढा) येथील तरुण शेतकरी विकास दशरथ माने यांनी योग्य नियोजन, सेंद्रिय खतांचा वापर बागेच्या आणि व्यवस्थापनातून ३ एकर डाळिंबाच्या बागेतून तब्बल ७२ टन उत्पादन घेतले आहे.
सरासरी ९० रुपये किलो दर मिळाल्याने त्यांना सुमारे ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
माने यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर जमीन असून त्यापैकी तीन एकरांवर डाळिंबाची लागवड आहे. बागेत एकूण ९५० झाडे आहेत. यातील ३०० झाडे आठ वर्षांची असून, त्यांचा सातवा बहार होता. या झाडांपासून सरासरी १२० किलो उत्पादन मिळाले.
उर्वरित ६५० झाडे चार वर्षांची असून, त्यांचा तिसरा बहार होता. या झाडांपासून सरासरी ६० किलो उत्पादन मिळाले. चार वर्षाच्या बागेतून सुमारे ३८ टन उत्पादन मिळाले. बागेच्या व्यवस्थापनात माने यांनी शेणखताचा वापर केला.
तसेच स्लरीची फवारणी करून रासायनिक फवारण्यांचा अत्यल्प वापर केला. त्यामुळे दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, संपूर्ण उत्पादनापैकी केवळ पाच टन डाळिंब रिजेक्शनमध्ये गेले.
बागेची लागवड १३ बाय ९ फूट अंतरावर असून बेडची रुंदी सहा फूट आहे. चार सप्टेंबरपासून हार्वेस्टिंग सुरू झाले. सुरुवातीला ८१ रुपये किलो दर मिळाला.
त्यानंतर दर वाढत जाऊन शेवटच्या कटिंगला १२१ रुपये किलोपर्यंत पोहोचला. संपूर्ण हंगामात सरासरी ९० रुपये किलो दर मिळाला. या बागेत १०० ग्रॅमपासून तब्बल ७०० ग्रॅम वजनाची डाळिंबे निघाली आहेत.



