“अक्षय खन्नाने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने खूप.”, ‘दृष्यम ३’च्या दिग्दर्शकाने सांगितलं नेमकं काय घडलेलं; म्हणाला.

‘दृश्यम ३: द कन्क्लूजन’ हा अजय देवगण अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात आधी अक्षय खन्ना ‘दृश्यम २’मधील आपली भूमिका पुन्हा साकारणार होता. मात्र, शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्याने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या म्हणण्यानुसार, ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्नाने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या सात दिवस आधी त्याने याबद्दल निर्मात्यांना कळवलं.
‘दृश्यम ३’चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं. अक्षय खन्नाने साकारलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नवीन कलाकार शोधण्यापासून ते त्या व्यक्तिरेखेत बदल करण्यापर्यंत आणि शूटिंगच्या तारखा सांभाळण्यापर्यंत अभिषेक पाठकला अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागली.
दृष्यम ३चा दिग्दर्शक काय म्हणाला?
चित्रपटाचं शूटिंग ख्रिसमसनंतर सुरू होणार होतं. मात्र, अक्षय खन्नाने चित्रपट सोडल्यानंतर त्याच्या भूमिकेसाठी निर्मात्यांकडे कोणताही कलाकार उपलब्ध नव्हता. या सगळ्या घडामोडींमुळे संपूर्ण टीम निराश झाल्याचं अभिषेक पाठक यांनी सांगितलं. “या सगळ्या प्रकारामुळे आम्ही आनंदी नव्हतो. मला वाटलं, ही काय पद्धत आहे?”. असं अभिषेक पाठक म्हणाला.
अभिषेक पाठक म्हणाला, “सगळ्यात कठीण होतं ते शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेणं. टीमला फक्त एवढंच सांगायचं होतं की, थांबा, काहीही रद्द करू नका. आपण हे करू. बोलून तर टाकलं होतं, आता ते प्रत्यक्षात करून दाखवायचं होतं आणि त्यासाठी स्क्रिप्टमध्येही बदल करावे लागणार होते. परिस्थितीचा तोडगा काढता येईल का, हे ठरवण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला. त्यावेळी अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेचं अजय देवगणबरोबरचं शूट सुरू होणार होतं आणि शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे सात दिवस बाकी होते.”
दृश्यम ३’च्या निर्मात्यांनी अखेर अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेसाठी जयदीप अहलावतची निवड केली. मात्र, त्यांच्याकडे तयारीसाठी फारच कमी वेळ असल्याने जयदीपसाठी चित्रपटात सहभागी होणं हे आव्हानात्मक काम असल्याचं दिग्दर्शक अभिषेक पाठकने सांगितलं. “शेवटच्या क्षणी येऊन व्यक्तिरेखेत स्वतःला सामावून घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्याकडे तयारी आणि वर्कशॉपसाठी सहा महिने नव्हते, तर केवळ काही दिवस होते. मी माझ्या शूटिंगसाठी जाण्यापूर्वी आम्ही दोनदा स्क्रिप्टचं वाचन केलं. त्यानंतर त्याच्या शूटिंगच्या एक-दोन दिवस आधी तो आला. त्याने काही प्रश्न विचारले आणि स्क्रिप्ट वाचली. मुंबईत त्याची लूक टेस्टही झाली, यापूर्वी ज्या प्रवासाचा तो भाग नव्हता, त्यात अचानक सहभागी होणं त्याच्यासाठी आव्हान होतं. चित्रपटाचा भाग बनणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं, पण त्यांनी ते खूप सुंदर पद्धतीने केलं,” असंही पाठक यांनी सांगितलं.
दृश्यम ३: द कन्क्लूजन’मध्ये अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि कमलेश सावंत हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांची नव्याने या चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीत एंट्री झाली आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.



