
अलिबाग : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोपवे सेवा जवळपास दोन महीने बंद राहणार आहे. देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक सुरक्षा तपासण्यांसाठी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक रायगड किल्ला पाहण्यासाठी भेट देतात. गडावर काही मिनिटांत पोहोचता यावे यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षितता आणि सेवा अखंडित राहावी यासाठी नियोजित तांत्रिक तपासण्या व देखभाल केली जाते. त्यासाठी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत रोप वे मार्गाची दुरुस्ती, उपकरणांची तपासणी आणि सुरक्षा मानकांची पडताळणी केली जाणार आहे.
देखभाल कालावधीत रोपवे सेवा प्रवाश्यांसाठी बंद ठेवली जाणार असल्याने पर्यटकांनी पर्यायी पायरी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन रायगड रोपवे कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी केले. पायरी मार्गाचा वापर करताना पुरेशी पाण्याची सोय, योग्य पादत्राणे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
रोपवे सेवा १६ नोव्हेंबर पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. देखभाल पूर्ण झाल्यानंतर सेवा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे रायगड किल्ल्यावर भेट देण्याचा विचार असेल तर या दोन महिने वाट पहावी लागणार आहे. जेष्ठ नागरीकांनी आणि हृदय विकार असलेल्यांनी पायरी मार्गाचा वापर करतांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण खडतर असल्याने गडावर चढून जाणे आव्हानात्मक ठरू शकरणार आहे.
पायरी मार्गाने गडावर चढून जाण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. तर रोप वे मार्गाने गडावर पाच ते सात मिनटात जाता येते. रोप वे सेवा बंद राहणार असल्याने गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गैर सोय होण्याची शक्यता आहे.



