गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश! ईडीकडून विशेष न्यायालयात पाच जणांवर पुरवणी तक्रार

आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीप्रकरणी गोव्याच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात अतिरिक्त आणखी पाच संशयितांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) पुरवणी तक्रार दाखल केली आहे. ईडीने गेल्या मार्च २००६ मध्ये अमलीपदार्थविरोधी कक्षाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे संशयित मधुपान सुरेश शशिकला यांच्यासह सातजणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तपासादरम्यान ईडीच्या असे निदर्शनास दिसून आले की संशयितांनी २०१६ पासून संघटित आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ड्रगच्या बेकायदेशीर तस्करीतून सुमारे ३.९६ कोटी रुपयांची अवैध कमाई झाल्याचे उघड झाले होते.
तेथे या पैशाचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करून त्याचा डिजिटल चलनाच्या वापरात आणून डार्क वेबद्वारे पुन्हा नवनवीन ड्रग पदार्थांची खरेदी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. या नव्याने दाखल केलेल्या तक्रारीतील पाच संशयितांनी या बेकायदेशीर पैशांची निर्मिती, खरेदी, लपवाछपवी तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करण्याच्या कारस्थानात ते सामील असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, ईडीने नुकतीच १६ सप्टेंबर रोजी संशयित अनाम चरण प्रधान याची सुमारे ९.४० लाखांची तर उत्तम चंद याची १७.४८ लाखांची अचल मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. देशभरात नशामुक्त भारताचा संकल्प सुरू करण्यात आल्यापासून ड्रग माफिया तसेच त्याच्याशी संबंधित टोळ्यांना गजाआड करण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.



