Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

1972 सारखा भीषण दुष्काळ पडणार का? मराठवाड्यात पावसाची स्थिती गंभीर, मागच्या 50 दिवसांपासून..

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस जवळपास गायबच आहे. यंदा एल निनोचा परिणाम जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने पावसाळा सुरु होण्याआधीच वर्तवला होता.

एल निनो सक्रीय झाल्यानंतर सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. सध्या महाराष्ट्रावर गंभीर दुष्काळाचं सावट आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. धरणं कोरडी पडतायत. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पण आकाशात पावसाचे ढग दूरदूर पर्यंत दिसत नाहीयत. मराठवाड्यात तर स्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात गेल्या 50 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. विभागात पावसाची तब्बल 199 मिमी तूट असून 275 महसूल मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामावर पावसाअभावी संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

पर्जन्यमानातही मोठी तफावत दिसून येत आहे. लातूरमध्ये सरासरीच्या केवळ 49.82 टक्के, तर धाराशिवमध्ये 56.03 टक्के आणि परभणीत 55.26 टक्के पाऊस झाला आहे. जालना 72.71 टक्के, छत्रपती संभाजीनगर 72.60 टक्के आणि नांदेडमध्ये 72.18 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम असून खरीप हंगामासह आगामी पाणीटंचाईचे आव्हानही वाढले आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, बँकेकडून थेट कर्जवसुलीच्या नोटिसा

धाराशिव जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मोर्चे, आंदोलन आणि रास्ता रोको सुरू असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना थेट कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील पांगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गुंडीपंत मारडकर यांना बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्जवसुलीसंदर्भात अलीकडे तीन नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या नोटिसांमध्ये वकिलांची फी देखील शेतकऱ्यांना भरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे पिकांचे नुकसान, पावसाचा मोठा खंड आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात, तर दुसरीकडे कर्जमाफी किंवा मदतीची अपेक्षा असताना कर्जवसुलीच्या नोटिसा हातात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पावसाची स्थिती

छत्रपती संभाजीनगर – 422 मिमी – 72.60%

जालना – 438 मिमी – 72.71%

बीड – 331 मिमी, – 58.52%

लातूर – 351 मिमी – 49.82%

धाराशिव – 337 मिमी – 56.03%

नांदेड – 578 मिमी – 72.18%

परभणी – 420 मिमी – 55.26%

हिंगोली – 543 मिमी – 68.33%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *