आयपीएलचे ५ सामने फिक्स करण्यासाठी ३ कोटी रुपये मिळाले- माजी रणजी क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा; चेन्नई सुपर किंग्स पुन्हा अडचणीत?

आयपीएल स्पर्धेतील सामने फिक्स करण्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याचा धक्कादायक खुलासा माजी रणजी खेळाडूने केला आहे. संघासंदर्भातली गोपनीय माहिती लंडनस्थित बुकींना देण्यासाठी प्रचंड रक्कम मिळाल्याचं या माजी खेळाडूने म्हटलं आहे.
तहलका’ मासिकाने केलेल्या शोधमोहिमेत या खेळाडूने आयपीएलमधल्या एका संघाबाबत कशी माहिती मिळवली आणि बुकींना दिली याची मााहिती दिली.
डिसेंबर २०२५ मध्ये राजधानी दिल्लीतल्या ढाका क्रिकेट अकादमीत हा माजी क्रिकेटपटू पत्रकारांना भेटला. सामने कसे फिक्स केले याची माहिती त्याने दिली. ‘२०२५ आयपीएल हंगामातले पाच सामने फिक्स केले. चेन्नई सुपर किंग्स संघात कोण आहे यासंदर्भात गोपनीय माहिती लंडनमधल्या बुकींना स्नॅपचॅटद्वारे दिली’, धक्कादायक खुलासा त्याने केला. ‘प्रत्येक सामन्यासाठी मला ६० लाख रुपये मिळाले, एकूण ५ सामन्यांची माहिती दिल्याबद्दल मला ३ कोटी रुपये मिळाले’, असं माजी क्रिकेटपटू रचित भाटियाने म्हटलं आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघातील कोणत्या खेळाडूने ही गोपनीय माहिती पुरवली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात बीसीसीआय किंवा पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्स संघ याआधीही फिक्सिंगच्या गर्तेत सापडला होता. फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली होती. आता हे नवीन प्रकरण उघडकीस आल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
२०१८-१९ मध्ये सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही फिक्सिंग केल्याची कबुली या खेळाडूने दिली आहे. बुकींकडून पैसे मिळणार असल्याने जाणीवपूर्वक २ वाईड बॉल टाकले असं या खेळाडूने सांगितलं. नागालँड रणजी संघात निवड व्हावी यासाठी १५ लाख रुपयांची लाच दिल्याचंही त्याने सांगितलं.
यंदाच्या आयपीएल हंगामात तसंच दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेत सामने फिक्स करण्यासाठी तय्यार होतो असं या माजी खेळाडूने सांगितलं. विशिष्ट माहितीसाठी इतके पैसे असं त्याचं समीकरण होतं. चेन्नई सुपर किंग्सने लिलावात एका खेळाडूला ताफ्यात घेतलं तर मला चेन्नई संघाची माहिती मिळू शकेल असं त्याने सांगितलं. तो संघात असेल, जेणेकरून मला मॅचफिक्सिंग आणि स्पॉटफिक्सिंग करता येईल. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी प्रत्येक सामन्यामागे १ कोटी रुपये मिळतात असं भाटियाने सांगितलं.
टॉसच्या आधी संघाची रचना कशी आहे याबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी ६० लाख रुपये मिळतात. हा खेळाडू दिल्ली प्रीमिअर लीगमध्येही खेळतो. स्पॉटफिक्सिंग आणि अंतिम अकराबद्दल माहिती देण्यासाठी प्रत्येक सामन्यासाठी ४० लाख रुपये मिळतात असं त्याने सांगितलं.



