‘समुद्र मंथन’ मोहिमेला पहिले मोठे यश, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ सापडला नैसर्गिक वायूचा साठा

सरकारी तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी ‘ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड’ (ONGC) ला समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ओडिशातील कोणार्क किनाऱ्यापासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर महानदी खोऱ्यात हा गॅसचा साठा असून, १८ सप्टेंबर रोजी MN-DW१८-१-H-D या विहिरीत हा साठा आढळल्याची माहिती ONGCने दिली आहे.
सुमारे १,४५० मीटर खोलीवर गॅसचा शोध
ONGCने महानदी खोऱ्यात या विहिरीचे खोदकाम केले. १,४४१ ते १,४५२ मीटर खोलीत नैसर्गिक वायू आढळला. या विहिरीचे नियोजित खोदकाम १,६२३ मीटर खोलीपर्यंत करण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून या विहिरीतून चांगला गॅस फ्लो आणि स्थिर जलाशयाचा दाब मिळत आहे. त्यामुळे या शोधाकडे देशाच्या ऑफशोअर ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
‘समुद्र मंथन’ मोहिमेअंतर्गत पहिली मोठी कामगिरी
ही शोधमोहीम केंद्र सरकारच्या ‘समुद्र मंथन’ अर्थात राष्ट्रीय अपतटीय शोध मोहिमेअंतर्गत करण्यात आली. महानदी बेसिनमध्ये या मोहिमेअंतर्गत झालेल्या पहिल्याच विहिरीत गॅसचा हा शोध लागला आहे.
किनाऱ्याच्या तुलनेने जवळ असलेल्या या क्षेत्रामुळे गॅस पाइपलाइनद्वारे किनाऱ्यावरील प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचवणे सोपे होऊ शकते. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीचा खर्च आणि उत्पादन सुरू करण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.
PNG नियमांमुळे व्यावसायिकीकरणाला चालना?
ONGCच्या मते, या परिसरात यापूर्वी झालेल्या इतर शोधांसोबत या नव्या गॅस साठ्याचाही PNG नियम, २०२५ अंतर्गत उपलब्ध असलेल्या सामायिक सुविधांचा वापर करून विकास करण्याचा पर्याय असू शकतो. यामुळे विविध गॅस विहिरींसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी उपलब्ध नेटवर्क आणि सुविधांचा वापर करून उत्पादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, या शोधाचे व्यावसायिक उत्पादन प्रत्यक्षात कधी सुरू होईल, हे पुढील मूल्यांकन आणि विकासाच्या निर्णयांवर अवलंबून असेल.



