Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या फोननंतर राहुल बोंद्रे ‘नॉट रिचेबल’; भाजप प्रवेशाला ब्रेक की काँग्रेसला चकवा देत कमळ हाती घेणार?

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पक्षप्रवेशाच्या काही तास आधीच नाट्यमय वळण मिळाले आहे. मंगळवारी मुंबईत राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या या संवादानंतर राहुल बोंद्रे भावूक झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ते नेमके कुठे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच त्यांचा मोबाईल फोन ‘नॉट रिचेबल’ येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या कथित भाजप प्रवेशाबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या मुंबईत आहेत. त्यांनीही राहुल बोंद्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोंद्रे सध्या कुठे आहेत, याची माहिती नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

राहुल बोंद्रे यांचा आज सायंकाळी चार वाजता मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. मात्र, पक्षप्रवेशाच्या काही तास आधीच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, त्यानंतर बोंद्रे यांनी कोणता निर्णय घेतला आणि त्यांचा भाजप प्रवेश होणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे पुढील काही तास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून, बुलढाण्यासह राज्याचे लक्ष राहुल बोंद्रे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *