Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह महाविकास आघाडीला राज्यात अनेक मोठे दणके बसले आहेत. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मविआची साथ सोडत महायुतीकडे आपली वाट वळवली आहे.

अशामध्ये आता काँग्रेसला बुलढाण्यात मोठा फटका बसला आहे. कारण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या जवळचे नेते तथा माजी आमदार आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा आपला निर्णय सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत जाहीर केला आहे.

माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की, काँग्रेस पक्षाने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी आणि पदे दिली. तसेच, जिवाभावाची अनेक माणसे दिली. मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि अत्यंत प्रेम तसेच मोलाचे मार्गदर्शन दिले. तर, हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिले. मात्र आता राजकीय वळणावर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत घोषणा केली आहे. यावेळी, ‘काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नाही,’ असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात मोठा फरक पडणार असून हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे.

कोण आहेत राहुल बोंद्रे?

राहुल बोंद्रे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांचे वडील सिद्धिविनायक बोंद्रे यांच्याकडून त्यांना समाजकारण आणि राजकारणाचे धडे मिळाले आहेत. सिद्धिविनायक बोंद्रे हे चिखली परिसरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अनेक शैक्षणिक व सहकार संस्थांचे संस्थापक होते. राहुल बोंद्रे यांनी चिखली नगरपालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. 2000 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती.

राहुल बोंद्रे यांनी दीर्घकाळ जिल्हाध्यक्ष पदाचे काम केल्यानंतर काँग्रेसने त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडले. यावेळी त्यांनी भाजपच्या रेखा खेडेकर यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसकडून आमदार म्हणून सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. पण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या श्वेता महाले यांनी त्यांचा पराभव केला. तरीही काँग्रेसने त्यांना दुसऱ्यांदाही म्हणजेच 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा चिखली मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण तेव्हाही त्यांचा पराभव झाला. अशामध्ये गेल्या काही काळापासून ते काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या पण अधिकृतपणे दुजोरा मिळाला नव्हता. अखेर रविवारी (20 सप्टेंबर) त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *