राज ठाकरेंवर वादग्रस्त टिप्पणी पडली महागात; प्रसिद्ध रीलस्टारच्या तोंडाला काळं फासून मागायला लावली माफी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर महेश मोटे याला चांगलेच महागात पडले. मनसे कार्यकर्त्यांनी महेश मोटेला चांगलाच दम देत त्याच्या तोंडाला काळा रंग फासला आहे.
तसेच राज ठाकरेंच्या फोटोसमोर नाक घासायला लावून त्याला माफी मागायला लावल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.
महेश मोटे हा मराठी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आणि रील स्टार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एका रीलमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त भाषा वापरली होती. या वक्तव्यानंतर तो १५ ते २० दिवस केरळमध्ये निघून गेला होता. मात्र, काल रात्री तो पुण्यात आल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर मनसेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष शुभम जगदाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कात्रजमधील एका पार्कमधून त्याला पकडले आणि थेट मनसेच्या कार्यालयात आणले.
मनसे कार्यकर्त्यांकडून ‘महाप्रसाद’ आणि अनोखी शिक्षा
कार्यालय आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलमध्ये महेश मोटेची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याला कार्यालयात आणून त्याच्या चेहऱ्यावर काळा रंग फासण्यात आला. त्याच्या डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा काढायला लावल्या आणि राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावली. या संपूर्ण प्रकारादरम्यान महेश मोटे रडत होता.
या घटनेनंतर महेश मोटेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून रडताना दिसत आहे. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी चुकून वक्तव्ये करुन खूप मोठी चूक केली आहे. मी सच सांगतोय मित्रांनो, महाराष्ट्रात राहून कधीही राज ठाकरे साहेब असोत किंवा आपली मनसे पक्ष असो, यांच्याबद्दल कधीही काहीही चुकीचे बोलू नका.” तसेच मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याशी कोणतीही दादागिरी केली नसून आपण स्वतःच केलेल्या चुकीची शिक्षा भोगत असल्याचे त्याने सांगितले.
मनसेचा स्पष्ट इशारा
या संपूर्ण घटनेनंतर मनसे नेते शुभम जगदाळे यांनी सांगितले की, महेश मोटेसारख्या इन्फ्लुएंसर्सना कार्यालयात आणून आमच्या खास अंदाजात महाप्रसाद देण्यात आला आहे. जर यापुढे कोणीही राज ठाकरे यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी केली, तर मनसे अशाच प्रकारे जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही यावेळी दिला.



